दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे सारख्या ग्रामीण भागातून पोलीस शिपाई म्हणून आपल्या सेवेची महाराष्ट्र पोलीस दलात सुरुवात करणारे अर्जुन आत्माराम गवस यांनी यावर्षी आपल्या सेवेची ३१ वर्षे पूर्ण केली. त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस दलात बढती झाली असून सहाय्यक पोलीस उप निरीक्षक म्हणून ते यापुढे सेवा बाजावणार आहेत.
अर्जुन गवस हे एका कष्टप्रिय शेतकरी कुटुंबातील, त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात १९९३ साली केली, त्यांनतर ते ज्या ज्या ठिकाणी सेवेसाठी हजर राहिले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या शांतता प्रिय स्वभावाने लोकांना आपलेसे केले, पोलीस म्हणजे करारी, रागीट त्यामुळे सामान्य लोकं पोलिसांपासून दूर पळतात पण श्री. गवस यांनी आपल्या शांतता प्रिय स्वभावाने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण करत अनेक प्रकरणे हातावेगळी केली, त्यांच्या कार्याने नेहमीच महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली, आज महाराष्ट्र पोलीस दिनाच्या स्थापना दिनी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व उप निरीक्षक आशिष भगत यांच्या हस्ते श्री.गवस यांच्या खाकी वर्दीवर सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदाचे स्टार लावून गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. ओतारी तसेच उप निरीक्षक श्री. भगत यांसह दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या कर्मचारी वर्गाने त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, अर्जुन गवस यांच्या पदोन्नतीबद्दल त्यांचे दोडामार्ग तालुका वासिय तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन होतं असून शुभेच्छाचा वर्षाव होतं आहे.