
सिंधुदुर्ग : कणकवली फोंडाघाट येथे बेकायदेशीर रित्या कत्तलीसाठी जाणारा जनावरांच्या वाहतुक करणार्या टेम्पोस फोंडाघाट चेक पोस्ट येथे पहाटे 3.35 च्या सुमारास पोलिसांनी पाठलाग करून रोखलं. या टेम्पोतील बारा जनावरांसह टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी चालक आसिफ महंमद इसाक सिराज (35 रा. कोल्हापूर-आजरा) व टेम्पोमालक उस्मान उर्फ ताहीर मुनाफ जमादार (25 रा. कोल्हापूर-नेसरी) व क्लीनर हुजेफा शकील सिराज (21 रा. कोल्हापूर आजरा) यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार फोंडाघाट चेक पोस्टवर कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल मारुती बाळू बारड यांनी दिली आहे.
मारुती बारड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लोरे फाटा येथे ए.एस.के कंपनीचे सिक्युरिटी प्रविण विश्वास पडेलकर यांना एका टेम्पोचा संशय आल्याने त्यांनी त्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतू, तो टेम्पो तिथे न थांबता फोंडाघाट चेक पोस्टच्या दिशेने जात होता. त्यानंतर प्रवीण पडेलकर यांनी फोंडाघाट चेकपोस्टवर कार्यरत असलेले पोलीस मारुती बारड यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फोंडाघाट चेक पोस्ट येथे टेम्पो अडवला असता त्या टेम्पोमध्ये दाटीवाटीने 4 बैल, 5 गायी, 1 वासरु आणि 2 म्हशी अशी 12 जनावरे भरलेली असल्याचे आढळून आले. जनावरे कुठे नेत असल्याचे टेम्पो मालकास विचारणा केली असता कोर्ले ता. देवगड येथून जनावर खरेदी करून कत्तलसाठी नेत असल्याचं त्याने सांगितले असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडून या सर्व जनावरांना कुडाळ येथे पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे टेम्पो चालक-मालक व क्लीनर यांच्यासह टेम्पो ताब्यात घेतला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत आहे.
दरम्यान, छत्रपती, जय मल्हारसह आमच्या दैवतांची नाव गाडीवर घालून हे रॅकेट गुरांची कत्तल करण्यासाठी युक्त्या वापरत आहे. जिल्हा पोलिस, कणकवली पोलिस, एलसीबी यांच्याकडून बऱ्याच ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. याच पद्धतीने हे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी प्रयत्न केले जावून गुरांची कत्तल रोखली जावी असं मत सामाजिक कार्यकर्ते स्वागत नाटेकर यांनी व्यक्त केले आहे. शेतकर्यांमध्ये गैरसमज पसरवत ही जनावर घेतली जातात. वर्षाला 10 ते 12 हजार जनावरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कमी होत आहेत असे पशुसंवर्धन खात्याचे म्हणणे आहे. नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनावरांची विक्री याचे प्रमाण लक्षात घेतले तर मिसिंग जनावरे जास्त आहेत. आपल्याकडे असणारा गोवंश हा दुर्मिळ आहे. 'कोकण कपिला' हा प्रकार दुर्मिळ असून तो कोकणातच मिळतो. अजून कुठे मिळणार नाही. आमच्या माध्यमातून देखील बांदा, सावंतवाडी भागात अजूनपर्यंत 74 गोवंश वाचवण्यात यश आलं आहे. त्यामुळे या रॅकेटचा नायनाट करण्यासाठी राज्य सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी स्वागत नाटेकर यांनी केली आहे.