
सावंतवाडी : कोलगाव - कुंभारवाडी येथे जेवणात अळंबी खाल्यानं विषबाधा झाली आहे. एकाच कुटुंबातील ९ जण यामुळे अत्यवस्थ झाले आहेत. उलटी, जुलाब त्यांना सुरू झाला असून नीट बघून अळंबी न खाल्ल्यास बऱ्याच वेळा असे प्रकार घडतात. सद्यस्थितीत ९ पैकी ६ रूग्णांची प्रकृती स्थिर असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अधिक उपचारासाठी रेफर केलं आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली.
जेवणात अळंबी खाल्ल्याने त्यांना उलटी व जुलाब सुरू झाला. स्थानिकांनी त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. कोलगाव येथील दिव्या कुंभार, दीपक कुंभार, गुणवंती कुंभार, दुर्वा कुंभार, निखिल कुंभार, नामदेव कुंभार, राजन कुंभार तसेच मळेवाच्या सोनाली चंद्रकांत कुंभार, चंद्रलेखा चंद्रकांत कुंभार यांना यातून विषबाधा झाली. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित सहा जणांवर सावंतवाडीत उपचार सुरू आहेत.
दरम्यान, निट बघून अळंबी न खाल्ल्यास असे प्रकार होतात. जाणते लोक बघून आणतात. मात्र, एखाद्याला न समजल्यास असे प्रकार घडतात. अळंबीची विषबाधा थोडी गंभीरच असते. त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घ्यावी अस आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केल आहे.