कवी संतोष जोईल यांची कविता शोषितांच्या श्रमाला महत्त्व देणारी

'काहीच सहन होत नाही!' काव्यसंग्रह प्रकाशन प्रसंगी कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 28, 2022 08:10 AM
views 196  views

सावंतवाडी : कविवर्य वसंत सावंत यांनी फोंडाघाटची भूमी सांस्कृतिक दृष्ट्या सुपीक केली आहे आणि आता नव्या पिढीतील कवी संतोष जोईल यांनी "काहीच सहन होत नाही" या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून फोंडाघाटच नाव साहित्य क्षेत्रात सर्व दूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची कविता शोषितांच्या श्रमाला महत्त्व देणारी असून सामान्यातल्या सामान्य माणसाचं दुःख मांडते. म्हणूनच जोईल यांची ही कविता दीर्घकाळ टिकणारी आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी फोंडाघाट येथे केले.

   प्रभा प्रकाशन प्रकाशित आणि कवी संतोष जोईल लिखित 'काहीच सहन होत नाही' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा फोंडाघाट कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. लिलित लेखक प्रा.वैभव साटम, कवी मधुकर मातोंडकर, प्रा.रुपेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उद्योजक मानसी माजगांवकर आणि दीपक माजगांवकर यांच्या हस्ते उद्घघाटन झालेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर संस्था चेअरमन सुभाष सावंत, संचालक संदेश पटेल,  राजन चिके,बबन हळदिवे, सचिन तायशेटे, माजी संचालक अविनाश सापळे, एलएमसी सदस्य केदार रेवडेकर, मुख्याध्यापक एस. ए. सावंत आदी उपस्थित होते.

    श्री साटम म्हणाले जोईल यांच्या या संग्रहातील कवितांमधून एक सूत्र आढळून येते.त्यांना समाजाबद्दल असणारा कळवळा तसेच शोषित समाजामध्ये होणारी अवहेलना, शेतकरी आणि इतर कष्टकरी समाजामध्ये होणारी हेळसांड हे प्रमुख कवितेचे सूत्र आहे. त्यामुळेच ही कविता उपेशित वर्गाचे प्रतिनिधित्व करते.

   श्री मातोंडकर म्हणाले, कवी जोईल ज्या प्रकारचं जगणं जगू पाहतात आणि ज्या समाजातल्या तळातल्या वर्गाला जोडून घेतात त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसते. जोईल कवी म्हणून उत्तम आहेतच परंतु ते माणूस म्हणूनही उत्तम आहेत.म्हणूनच त्यांच्या या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात रसिकांची उपस्थिती लाभली. चांगल्या कवितेला चांगला वाचक मिळणे ही आताच्या काळात दुर्मिळ अशी गोष्ट आहे.या पार्श्वभूमीवर लोकांची अशी वाढती संख्या कार्यक्रमाला लाभणे याचा अर्थ जोईल समाजाला सतत जोडून राहिले आहेत असाच होतो.

     मानसी माजगावकर म्हणाल्या, कवी जोईल यांना मी अनेक वर्ष ओळखते.परंतु त्यांच्या कवितेची एवढी मोठी वाटचाल माहित नव्हती. या संग्रहाच्या निमित्ताने त्यांची ही वेगळी गुणवत्ता आता सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. दीपक माजगावकर म्हणाले, कष्टकरी वर्गाचं जगणं या कवितेत दिसते आहे. म्हणून जोईल यांची कविता मला आवडली आहे. कोणतीही चांगली कविता तळ्यातल्याच वर्गाच दुःख मांडत असते. जोईल यांचा हा कवितेचा प्रवास पुढे मोठ्या प्रमाणात वाढत जावा.

     जोईल म्हणाले, मी खूप वर्ष कविता लेखन करत होतो.परंतु कुठेच प्रसिद्धीला दिल्या नव्हत्या. मात्र कवी कांडर यांचे एक व्याख्यान ऐकून मला त्यांना जोडून घ्यावसे वाटले आणि यातूनच माझा पुढचा कवितेचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर समाज साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला मी जाऊ लागलो. आणि अजून चांगली कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. यातूनच या काव्यसंग्रहाची निर्मिती झालेली आहे.माझ्या कवितेच्या या प्रवासात चांगली माणसे मिळाल्यामुळेच मी तो करू शकलो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्या हायस्कूलच्या संस्थेने सर्वतोपरी सहकार्य केलं त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.

   यावेळी राजन चिके यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी कसाल हायस्कूलचे मुख्याध्यापक उसगावकर, हिरलोक हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत, गव्हाणे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री मुल्ला, निलेश पारकर, सुशील डवर, शेखर गवस आदीसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.प्रा. रुपेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.एस.ए.सावंत यांनी प्रास्ताविक केले.पाहुण्यांची ओळख वृषाली पवार यांनी करून दिली.आभार आर्या भोगले यांनी मानले.दिपाली जाधव या विद्यार्थिनीने गायलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली