कोमसापतर्फे कवी ना. धो. महानोर यांना आदरांजली

Edited by: विनायक गावस
Published on: August 08, 2023 16:52 PM
views 106  views

सावंतवाडी : दिवंगत साहित्यिक, रानकवी ना. धो. महानोर यांना कोकणातील सावंतवाडी अर्थात सुंदरवाडी अनुभवायची होती, पाहायची होती. पण त्यांचे हे स्वप्न शेवटपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यांनी सर्वप्रथम माजी आमदार जयानंद मटकर यांच्याकडे ही इच्छा कित्येक वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती आणि त्यानंतर आत्ता अनेक साहित्यिक,कवींकडेही त्यांनी मला सुंदरवाडी पहायची आहे, असं बोलूनही दाखवलं होतं. एवढं सुंदरवाडीवरचे प्रेम एका महान कवी साहित्यिकाला होते. त्यांच्या जाण्याने केवळ निसर्गच पोरका झाला असे नव्हे तर अवघी मानवताच पोरकी झाली आहे, अशा शब्दात इतिहासकार व साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा यांनी शोक व्यक्त केला.


सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य परिषद व सावंतवाडी शाखाच्या वतीने कवी ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गणित तज्ज्ञ, लेखिका स्व. मंगलाताई नारळीकर, निर्माते व दिग्दर्शक नितीन देसाई, माजी खासदार तथा साहित्यिक ॲड. बापूसाहेब परुळेकर यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम हॉटेल पर्ल येथे आयोजित करण्यात आला. प्रारंभी स्व. कवी महानोर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी घेतलेल्या शोकसभेत श्री. बुवा पुढे म्हणाले गीतकार, रानकवी, साहित्यिक, राज्यकर्ते आणि शेतकऱ्यांची व्यथा जाणणारे, निसर्गावर अफाट प्रेम असणारे कवी महानोर यांचं सावंतवाडीशी नातं वेगळंच होतं. त्यांनी विधानसभेत आमदार असताना त्यांचे सहकारी माजी आमदार जयानंद मटकर यांच्याकडे मला सावंतवाडीची सुंदर वाडी पाहायची आहे, अनुभवायची आहे असं बोलून दाखवलं होतं. पण त्यांना सुंदरवाडी येण्याचा योग कधी आला नाही. मात्र ही त्यांची सुंदरवाडी पाहण्याची प्रखर इच्छा आजतागायत होती.


यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी शेती, मातीशी नाळ असलेले साहित्यिक, कवी महानोर यांच्या जाण्याने साहित्य चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य निघावे, कोणती पुण्य अशी येथील फळाला आणि माझ्या पापणीला पूर यावे!, अशा शब्दात शोक व्यक्त केला. यावेळी मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा खजिनदार भरत गावडे, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, तालुका सहसचिव राजू तावडे, सदस्य प्रा. रुपेश पाटील, शंकर प्रभू यांनीही एक महान साहित्यिक, आणि ज्यांना शेतीबद्दल अफाट प्रेम होते, असे कवी महानोर यांनी साहित्य चळवळ जिवंत ठेवली, ते एक महान साहित्यिकच नव्हे तर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी जो त्याग दिला तो खरच महान आहे, अशा शब्दात शोक व्यक्त केला.


यावेळी कोमसापचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, मेघना राऊळ, रामदास पारकर, प्रदीप प्रियोळकर, बालकवी मनोहर परब, विनायक गांवस यांसह साहित्य प्रेमी उपस्थित होते. आभार विनायक गांवस यांनी मानले.