
वेंगुर्ले : द्वारका येथे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर यशोभूमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातून सुतार शिल्पकार समाजाचे प्रतिनिधी म्हणून एमएसएमई मंत्रालयस्तरावरील विश्वकर्मा कौशल्य योजना शुभारंभच्या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष शरद मेस्त्री यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शरद मेस्त्री यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पी. एम. विश्वकर्मा' प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
दिल्ली येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय स्तरावरील विश्वकर्मा कौशल्य योजना शुभारंभ कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून सुतार समाज प्रतिनिधी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष व भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस येथील शरद मेस्त्री यांना निमंत्रित करण्यात आले होते. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पी. एम. विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा उपस्थित होते.
यावेळी मोदी म्हणाले, पाठीच्या कण्याप्रमाणेच देशासाठी विश्वकर्मा योजना महत्त्वाची आहे. हजारो वर्षांपासून भारताच्या समृद्धीच्या मुळाशी असलेले मित्रच आपले विश्वकर्मा आहेत. जसा पाठीचा कणा आपल्या शरिरात भूमिका बजावतो, त्याचप्रमाणे हे विश्वकर्मा साथीदार सामाजिक जीवनात भूमिका बजावतात. देशाच्या प्रत्येक श्रमिकाला प्रत्येक विश्वकर्म्याला मी 'यशोभूमी' समर्पित करतो. विश्वकर्माना ओळख आणि पाठबळ मिळणे ही काळाची गरज आहे. आऊटसोर्स करण्यात येणारे काम आपल्या विश्वकर्मा मित्रांना मिळाले पाहिजे आणि जागतिक पुरवठा साखळीचा ते महत्त्वाचा भाग बनले पाहिजेत. या बदलत्या कालखंडात विश्वकर्मा मित्रांसाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि साधने अतिशय महत्वाची असल्याचे ते म्हणाले.