
सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबात जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादक बागायतदार संघाने तीव्र नाराजी व्यक्त करत याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. दरम्यान विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याची ग्वाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना दिली. मात्र पुढील आठवड्यात विम्याची रक्कम न मिळाल्यास विमा कंपनी आणिPM शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाईल असा इशाराही या शेतकरी संघाने दिला आहे.
जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फळपीक विमा योजना २०२४-२५ अंतर्गत विमा उतरविला होता. मात्र वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी बँका, सोसायट्या यांच्याकडून घेतले कर्ज फेडू शकत नाहीत. मुळात विम्याची जोखीम कालावधीत संपल्या नंतर ४५ दिवसात नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर नुकसान भरपाई ३० जून २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे आवश्यक होते. मात्र अद्यापही विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. याबाबत आज आंबा काजू उत्पादक बागायतदार संघ मर्यादित सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत ५ ऑक्टोबर पूर्वी विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले. याबाबात या संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान याबाबत या संघाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेत याकडे लक्ष वेधले यावेळी संबंधित कंपनीशी चर्चा करून विम्याची रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली असल्याचे आंबा काजू उत्पादक बागायतदार संघ मर्यादित सिंधुदुर्गचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी सांगितले. यावेळी प्रकाश बोलवेलकर, अभिषेक चमणकर, सुरेश धुरी, शिवराम आरोलकर, बाळा गावडे, बापू मोर्ये, प्रणय नाडकर्णी यांच्यासह आंबा काजू शेतकरी उपस्थित होते.










