
कुडाळ : नव्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्य शासनाने भरभरून असा निधी दिला आहे. या ठिकाणचे रस्ते तसेच गड - किल्ले यांचे संवर्धन करण्यासाठी आणि मच्छिमार बांधवांसाठी आवश्यक असणाऱ्या उपायोजना या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिंदे - फडणवीस सरकारचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले होते. यावेळी भाजपचे कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष बाळू देसाई, प्रवक्ते अविनाश पराडकर, सरचिटणीस बंड्या सावंत, भाजप गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. या ठिकाणचे पाटबंधारे विभागाचे कामे तसेच रस्ते, पुल, घाट रस्ते यांना मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. मच्छीमारांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी पुरातत्व खात्याला निधी देण्यात आला आहे. महिलांसाठी एसटी बस प्रवास, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. मुलींसाठी कन्या योजना तसेच शेतकऱ्यांसाठी विमा योजना या सरकारने दिली आहे. हा अर्थसंकल्प सर्व घटकांना न्याय देणारा असल्याचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.