
सावंतवाडी : देवाधर्माची नावे देऊन शक्तीपीठ महामार्गावरुन सरकार सामान्य जनतेच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर असताना तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना जनतेने न मागितलेला हा महामार्ग सरकार मुद्दामहून लादत आहे. सिंधुदुर्गातील 13 गावातून जाणाऱ्या या महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची वैचारिक परिषद 4 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सावंतवाडी शहरातील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समितीचे निमंत्रक डॉ.जयेद्र परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री परुळेकर म्हणाले, सिंधुदुर्गातील 13 गावातून जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाती सहा गावांमध्ये इकॉसिंसेटीव्ह झोन लागू झाला आहे. असे असताना हा महामार्ग त्या ठिकाणाहून गेला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे. सरकार एकीकडे या महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेता हा महामार्ग आंबोली मार्गे झाराप झिरो पॉईंट येथून बांदा पत्रादेवी असा नेण्यात येणार असे सांगण्यात आले होते. परंतु अद्याप पर्यंत हा महामार्ग गेळे आंबोली मधून बांदा असा प्रस्तावित असल्याचे दाखवण्यात येत आहे. मुळात या महामार्गाला देवाधर्माची नावे देऊन एक प्रकारे जनतेच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि शेती बागायतींचे नामोनिशाण मिटणार आहे. त्यामुळे या महामार्गाबाबत जनतेचे डोळे उघडण्यासाठी येत्या ४ नोव्हेंबर रोजी साडेदहा वाजता शहरातील काझी शहाबुद्दीन हॉल येथे वैचारिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, आमदार बंटी पाटील, माजी आमदार वैभव नाईक, आमदार कैलास पाटील शक्तिपीठ महामार्ग विरोधी समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे,कॉम्रेड संपत पाटील, राजेंद्र गाड्यांनवार अभिमत उपस्थित राहणार आहे. या वैचारिक परिषदेला मोठ्या संख्येने शेतकरी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
 
 
    
                    
   


 
 
      
   
   
  
 
  
  
  
  
  	
   
   



 
 
               





 
       
       
       
       
      