न.प.च्या फिरत्या पथकाद्वारे प्लास्टिक जप्तीची कारवाई

Edited by: विनायक गांवस
Published on: December 12, 2024 16:32 PM
views 503  views

सावंतवाडी  : सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे फिरत्या पथकाद्वारे सावंतवाडी शहरात आठवडा बाजारामध्ये प्लास्टीक जप्तीची कारवाई करण्यात आली. तसेच शहरातील रामेश्वर प्लाझा, केसरकर कॉम्प्लेक्स येथील स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, फळविक्रेते, फुलविक्रेते या ठिकाणीही  प्लास्टीक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या अंदाजे २०० किलो एवढ्या वजनाच्या प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख धनंजय देसाई, स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, देविदास आडारकर, अक्षय पंडित यांनी ही कारवाई केली. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने १ जुलै २०२२ पासून ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लास्टीक पिशवी उत्पादन, आयात, साठवण, विक्री व वापरावर बंदी केलेली आहे. महाराष्ट्र प्लास्टीक आणि थरमाकॉल अधिसूचना २०१८ नुसार दोषी आढळल्यास ५०० रुपये जागेवर दंड व संस्थात्मक पातळीवर ५००० रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायिक व नागरिकांनी या आदेशाचे पालन करून सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद करावा. प्लास्टीक पिशव्यांचा वापराऐवजी पर्याय म्हणून कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करावा. अशा प्रकारची जनजागृती स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडिया द्वारे सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत नियमित करण्यात येते. 

पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांचा वापर करू नये, जास्तीत जास्त पर्यावरण पूरक बाबींचा वापर करण्यात यावा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या विक्री करणाऱ्यांची माहिती नगरपरिषद प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.