पिंगुळीत रेल्वेच्या रुळाचा वापर स्मशानभूमीसाठी

वैभव नाईक, परशुराम उपरकरांचा आरोप ; 'आरपीएफ'ला धरलं धारेवर
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 05, 2025 14:01 PM
views 539  views

कणकवली : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या रुळाचा वापर करण्यात आला आहे. याबाबा कोकण रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनही काहीच संबंधितांवर काहीच कारवाई न झाल्याबाबत उबाठा शिवसेनेने माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली पिंगुळी येथील ग्रामस्थांनी कणकवलीतील रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) कार्यालय गाठून आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना जाब विचारला. ही चोरी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच एका भंगार व्यवसायिकाने केली आहे. त्यानंतर या रुळांचा वापर स्मशानभूमीसाठी करण्यात आल्याचा आरोप वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी केला. यावेळी उबाठा शिवसैनिकांनी 'रेल्वे रुळाची चोरी करणाऱ्यांचा आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या रेल्वे पोलिसांचा, निषेध असो' अशी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उबाठा शिवसेना कणकवली तालुकाप्रमुखा कन्हैया पारकर देखील उपस्थित होते.


रेल्वेचे रुळ चोरीस गेल्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार करूनही त्याची का दखल घेतली नाही, असा सवाल वैभव नाईक यांनी केला. यावेळी स्मशानभूमीला रेल्वे रुळाचा वापर करण्यात आल्याचा २ जूलैचा गुगलवरील फोटोही नाईक यांनी दाखवला. तर कोकण रेल्वेचे वरिष्ठ शाखा अभियंता संतोष कदम यांच्याकडे ग्रामस्थांनी २० जूलैला तक्रार केली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणीही केली. मात्र, तेथेही काहीही दिसून आले नाही, असे आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांनी सांगितले. मात्र याबाबत ५ जूलैला प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केल्याचे ग्रामस्थांना निदर्शनास आणले.

दरम्यान सदर रुळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला ठेवलेले होते, ते तोडून एका भंगार व्यवसायिकाने संबंधित सरपंचाच्या ताब्यात दिले आहेत. त्यामुळे या भंगार व्यवसायिकाची चौकशी करा, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली. 

अखेरीस ग्रामस्थांकडून नंबर घेऊन सुरवाडे यांनी भंगार व्यवसायिकाला फोन करून विचारणा केली. मात्र, भंगार व्यवसायिक आपण चोरी केल्याचे मान्य करत नसल्याने सुरवाडे यांनी त्याला मंगळवारी सायंकाळपर्यंत आरपीएफच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले. भंगार व्यवसायिकाची कसून चौकशी केली जाईल, असे आश्वासनही सुरवाडे यांनी आंदोलकांना दिले.

तर या घटनेची कसून चौकशी व्हायला हवी. कारण, रेल्वेच्या साहित्याची विनापरवाना उचल करून त्याचा वापर स्मशानभूमीसाठी करणे, ही गंभीर बाब आहे, असे उपरकर, नाईक म्हणाले. यावेळी नाईक यांनी आरपीएफच्या बेलापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही मोबाईलद्‌द्वारे संपर्क साधला. तर घडल्या प्रकारातील दोषींवर कारवाई न झाल्यास आठ दिवसांनी पुन्हा एकदा आरपीएफचे कार्यालय गाठून आंदोलन करू, असा इशाराही नाईक, उपरकर यांनी दिला.

याप्रसंगी युवासेना पदाधिकारी राजू राठोड, पिंगुळी ग्रामस्थ दीपक राऊळ, गंगाराम सोडविलकर, चेतन राणे, दीपक धुरी, केतन शिरोडकर, नामदेव पिंगुळकर, सचिन ठाकूर, साज खान आदी उपस्थित होते.