प्रथमच होतोय तीन दिवसांचा 'पिंगुळी महोत्सव'

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: December 10, 2024 12:06 PM
views 367  views

कुडाळ : पिंगुळी गावातील विविध सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष, पिंगुळी ग्रामपंचायत आणि साई कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रथमच पिंगुळी महोत्सव 2024 चे आयोजन 25, 26,व 27 डिसेंबर सलग तीन दिवस बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगण एमआयडीसी कुडाळ येथे सायंकाळी 6ते 11 या वेळेत करण्यात आले आहे. तिन्ही दिवस विविधांगी भरगच्च कार्यक्रमाबरोबरच कोकणात प्रथमच या महोत्सवात अभंगवाणी  कार्यक्रम होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी म्हणून राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा, जिल्हास्तरीय मिस पिंगुळी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या विविध स्पर्धां होणार आहेत. पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रा हे खास आकर्षण असणार आहे. महोत्सवात विविध असे 80ते 100 स्टॉल असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई व पिंगुळी ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर यांनी दिली. 

  कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव  गेल्या काही वर्षापासून विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कला क्रीडा धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात नांवलौकिक प्राप्त  पिंगुळी  गावाने आपली वेगळी ओळख केली आहे. हिच ओळख  पिंगुळी महोत्सवाच्या माध्यमातून सर्वासमोर यावी या अनुषंगाने गावातील सर्व ग्रामस्थ,संस्थाच्या  सहकार्याने हा महोत्सव 25 ते 27 डिसेंबर या कालावधीत होत आहे. याबाबत आज येथे एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई, ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर, बॅरिस्टर नाथ पै संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, उद्योजक गजानन कांदळगावकर, ठाकर समाजाचे भगवान रणसिंग, रणजीत रणसिंग. साई कला मंचाचे अध्यक्ष भूषण तेजम,अमित तेंडोलकर पोलीस पाटील सतीश माड्ये, वैभव धुरी, शशांक पिंगुळकर, सचिन सावंत,सचिन पालकर, दर्शन कुडव, मयूर लाड, प्रणव प्रभू, राज वारंग आदी उपस्थित होते.

श्री देसाई म्हणाले, श्री देव रवळनाथ पंचायतन यांच्या आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राऊळ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंगुळी गावात हा पिगुळी महोत्सव 2024 होत आहे, हा महोत्सव पिंगूळीवासीयांकडून संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना एक अप्रूप पर्वणी ठरेल असा हा महोत्सव असणार आहे.  ज्यामध्ये ढोल ताशाच्या गजरात संत राऊळ महाराज मठापासून ते बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगण एमआयडीसी कुडाळपर्यंत भव्य दिव्य मिरवणुकीच्या माध्यमातून सदरील कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  या महोत्सवाच्या निमित्ताने पिंगुळी गावातील  विशेष कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.  पिंगुळी गाव हा ज्या नावामुळे ओळखला जातो तो पिंगळी समाज यासकडून कळसुत्री बाहुल्या, पांगुळ बैल, चित्रकथी यांसारख्या विविध लोककलांचा  कार्यक्रम या निमित्ताने सादर होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रांगोळी स्पर्धा आणि मिस पिंगुळी 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील. या कार्यक्रमामध्ये पिंगुळीगावातील कलाकारांचे विविध नृत्यविष्कार, कलाविष्कार, गीताविष्कार  सादर केले जाणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात गावातील  नामवंत गायक, गायिका वादक यांच्या सादरीकरणाने होईल.

त्यानंतर राज्यस्तरीय लोककला नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या लोककलांचा नृत्याविष्कार सादर केला जाईल व त्याचा बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते केला जाईल. महोत्सवाच्या अंतिम आणि तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात पिंगुळी  गावातील हरहुन्नरी गायक,  वादक कलाकार यांच्या ऑर्केस्ट्राने होईल आणि कार्यक्रमाची सांगता मुंबई येथील जगभर नावाजलेला अभंग रिपोस्ट यांच्या अभंगवाणी सादरीकरणाने होईल. या महोत्सवाला हिंदी, मराठी  चित्रपट  व नाट्यसृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत.  खाद्यपदार्थांचे स्टॉल, घरगुती पदार्थांचे स्टॉल, फोर व्हीलर, टू व्हीलर कंपन्यांचे  स्टॉल, बँका ,पतसंस्था शिक्षण संस्था यांचे  स्टॉल तसेच छोट्या मुलांसाठी वेगवेगळे फनी गेम्स, आकाश पाळणे , जम्पिंग जॅम, अशा विविध प्रकारच्या खेळांचा सहभाग या महोत्सवात असणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर, मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिर त्याच सोबत हा महोत्सव पाहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी, प्रश्नमंजुषा, मानाची पैठणी , लकी ड्रॉ अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे यात विजयी होणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.  या महोत्सवाच्या निमित्ताने बॅरिस्टर नाथ पै क्रीडांगणावर भव्य दिव्य देखावे तयार केले जाणार आहेत तरी जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी पिंगुळी महोत्सव 2024 मध्ये  उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भूषण तेजम   94211 44949 अमित तेंडोलकर  94212 61919 यांचेशी संपर्क साधावा.