
'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा..!
पुष्प - २९ वं
कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या 'जागर' 'कोकणच्या साहित्य रत्नांचा', या विशेष कार्यक्रमात आपण आज भेटणार आहोत लाल मातीतील लाल मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या आणि फुले, शाहू,आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या कवीला. वेंगुर्ला तालुक्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि याच तालुक्यात वेंगुर्ला तालुक्याच्या लालपरी व्यवस्थापनाची जबाबदारी निभावूनही आपल कवीमन जपणारे हे कवी आहेत अरुण नाईक. जागर कोकणच्या साहित्यरत्नांचा या विशेष कार्यक्रमातील हे २९ वं पुष्प आहे. दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई यांनी त्यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.
मुलाखत
पुष्प : २९ वं.
तुमच्या लेखनाची सुरूवात कशी झाली ?
माझे वडील शेतकरी होते. मध्यंतरीच्या काळात नोकरीसाठी मुंबईला गेले. परंतू, तिथे जास्त काळ आम्ही राहीलो नाही. वडीलांसह कुटुंब गावी आलं. येथील शेती करून उदरनिर्वाह करू लागलो. माझ्या काकांना मी घाबरायचो. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. शिक्षण घेत दहावी पूर्ण केली. रेडीओ घरामध्ये होता. त्यातून गाणी, कार्यक्रम ऐकण्याची सवय लागली. यातूनच आपणही काहीतरी लिहावं, गाणी रचावी या हेतूने लिहू लागलो. अकरावी-बारावीच्या दरम्यान ज्यांच्यामुळे मी घडलो असे कवी आ.सो.शेवरे यांची भेट झाली. त्यानंतर 'झाड' नावाची पहिली कविता मी लिहीली. त्यातूनच मी कवीतेच्या नादी लागलो.
धावपळीच्या एसटी डिपार्टमेंटमध्ये असताना आवड कशी जोपासली ?
रोजच धावळीच असं एसटी डिपार्टमेंटच जीवन असतं. नेहमीच व्यवस्थापन करताना चांगलीच तारांबळ उडते. यातच माझ्या आजूबाजूला जे घडत होतं ते कवितेच्या माध्यमातून मी मांडलं. समाजातील घटनांवर, आजूबाजूच्या जगण्यावर कवितेतून भाष्य केलं. गुण, दुर्गुण मांडण्याच काम केलं. अनेकांना माझ्या कविता भावल्या. विविध पुरस्कारही माझ्या कवितांना मिळत गेले. त्यातूनच हळूहळू माझी कविता वृद्धिंगत होत गेली. माझ्या लालपरीवरच्या चालकांची कविता माझ्या आगामी काव्यसंग्रहात येत आहे.
आपल्या 'अंधारवर्तुळातील वेदनापट' कविता संग्रहाविषयी काय सांगाल ?
वस्तीतल जगणं यात मांडल आहे. जातीयता, अस्पृश्यता सारख्या घटना मी यातून मांडल आहे. समाजातील वेदना शब्दबद्ध केल्या आहेत. झाडं नावाची कविता ही माझी पहिली सुरूवातीची कविता आहे. ''नियमित अंधार पांघरलेले झाड आता प्रकाशाच्या वाटा शोधत फिरते आहे.'' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले हक्क व त्यांच्या विचारांनी माणूस केंद्रबिंदू मानून प्रकाशाच्या वाटेन निघालो आहोत अशी ही कविता आहे. राजकीय, सामाजिक गोष्टी विद्रोही कवितेतून मांडल्या आहेत.
आकाशवाणी केंद्रावरून केलेल्या काव्यवाचनाचा अनुभव कसा होता ?
'ऑल इंडिया रेडीओ'वर काव्यवाचन केल होत. महेश केळुसकर यांच्यामुळे ही संधी प्राप्त झाली. माझ्या कविता संग्रहातील कविता मी सादर केल्या. जुने रेकॉर्ड, सादरीकरणाच्या जुन्या पद्धती तिथ पहाता आल्या. कविता सादर करताना खूप चांगल वाटल. त्यातूनच आपण लिहीत रहावं अशी प्रेरणा मिळत गेली. समाजासाठी लिहीत रहावं या उद्देशाने शब्द रचत गेलो.
आजकाल वाचन कमी होतंय, लेखकही व्यावसायिक दृष्टिकोनातून अधिक लेखन करतायेत , आपण मात्र ही आवड जोपासली, काय सांगाल ?
वाचन संस्कृती जपली जात आहे. ती कमी होत आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. वाचणारे लोक वाचत आहेत. मुलं देखील वाचत आहे. फक्त ती मोबाईलवर वाचत आहेत. विविध साधनांचा उपयोग ते करत आहेत. नवी पिढी देखील लेखन करत आहे. कविवर्य डॉ वसंत सावंत यांच्या कोजागिरी कवी संमेलातून माझ्यासारख्याला प्रेरणा मिळाली. अशीच प्रेरणा आजच्या पिढीला निर्माण होण्यासाठी कार्यक्रम झाले पाहिजेत.
आपले आवडते लेखक, कवी यांच्याविषयी काय सांगाल ?
आ.सो.शेवरे, नामदेव ढसाळ, चिं.त्र्य. खानोलकर आदींच्या साहित्याच वाचन मी केल. यातून त्यांच्यासारख जगण्यातल मी लिहू लागलो. प्र.श्री.नेरूरकर यांच्यासोबत साहित्यावर चर्चा केली. यातूनच अधिक साहित्य रूची निर्माण झाली.
आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीकडे कवी म्हणून कसं पहाता ?
आजची सामाजिक, राजकीय परिस्थिती पहाता राजकीय नेते सर्वसामान्यांना केवळ मतापुरत वापरून घेत आहेत. फुले, आंबेडकर, शाहू यांना मतांसाठी वापरलं जातं आहे. त्यातून सर्वसामान्यांच्या पदरात मात्र काहीही पडत नाही. पक्षीय राजकारणात बघता समाजाच्या भल्यासाठी कुणी पक्षांतर करत नाही. राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी इकडे-तिकडे जातो. लोकांच त्यांना काहीही पडलेलं नाही. सर्वसामान्य माणूस आहे तिथेच आहे.
कधीकाळी कोकणची लाल परी ही दळवळणाची प्रमुख साधन होती, आपण तिथे नोकरी करताय, याच लाल परीवर आपण एखादी कविता रचलीय का?
हो हा ते प्रज्ञावंत हे काव्य माझ्याकडुन रचले गेलंय. कारण त्याकाळी कोकणातील रस्ते हे कच्चे आणि खड्डे यांनी माखलेले असायचे. अशा दुर्गम आणि खेडोपाड्यात ड्युटी करणारे वाहक चालक हे एक चहा दोन कटिंग करून प्यायचे. अगदी जागोजागी खड्ड्यांनी व्यापलेलं रस्त्यांचे जाळे आणि मातीचे रस्ते यामुळे लोकांना वाहतुकीची सेवा देताना हेच एस टी चे ड्रायव्हर - क्लिनर जी सेवा देत होते ती अतुलनीय होती. सकाळी घातलेले कपडे संध्याकाळी धुळीने माखलेले असायचे. दिवसभर प्रवास करून कंबर आणि पाठीचे मणके यांचा तर विचार न केलेलाच बरा. पण तरीही हे प्रज्ञावंत जनसेवा आणि आपले कर्तव्य इनामे इतबारे बजावत होते. त्याच वर्णन या कवितेत आहे. आज मात्र कोकणात परिस्थिती बदलली आहे. गावोगावचे रस्ते डांबरयुक्त झाले आहेत.