औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी कडकडीत बंद

उद्यापासून काळ्या फिती लावून काम !
Edited by: विनायक गांवस
Published on: May 14, 2026 20:16 PM
views 21  views

सिंधुदुर्ग : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते बुधवार २० मे २०२६ रोजी कडकडीत बंद पाळणार आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, कॉर्पोरेट कंपन्यांच्या अव्यवसायिक डिस्काउंट बंद कराव तसेच बनावट औषधींपासून देश‌ वाचवावा यासाठी हा लढा पुकारण्यात आला असल्याची माहिती 'सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन'चे अध्यक्ष आनंद रासम आणि सचिव संजय सावंत यांनी दिली आहे.

तसेच २८ ऑगस्ट २०१८ ची अधिसूचना आणि २६ मार्च २०२० ची अधिसूचना सरकारने मागे घ्यावी, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून राबवली जाणारी शोषणात्मक किंमत धोरणे आणि अव्यवसायिक डिस्काउंट बंद व्हावेत आदीही मागण्या करत आंदोलन पुकारले आहे. यासाठी जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली असून १५ मे ते १९ मे २०२६ या काळात सर्व औषध दुकानांतील मालक, फार्मासिस्ट आणि कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत आपला निषेध नोंदवणार आहेत. तर १९ मे च्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २० मे च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने २४ तास पूर्णपणे बंद राहतील. २० मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, फार्मासिस्ट आणि कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे जमा होतील आणि आपल्या मागण्यांसाठी 'हल्लाबोल' आंदोलन करतील अशी माहिती देण्यात आली आहे. रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीसाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टस् अँड ड्रगिस्टसचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव राजीव सिंघल, महाराष्ट्र राज्य केमिस्टस् अँड ड्रगिस्टस् असोसिएशन अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव अनिल नावंदर,  सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष आनंद शांताराम रासम, सचिव संजय दिगंबर सावंत यांनी दिलगीर व्यक्त केली आहे.