
मुंबई : कोकण विभागातील पर्यटनाला चालना देणे तसेच स्थानिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यटन विभागद्वारे सुवर्ण वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण वर्ष निमित्त ‘आंबा महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे दि. १५ ते १८ मे २०२६ या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच पर्यटक आणि कोकणप्रेमींनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होऊन कोकणच्या संस्कृतीचा आणि आंब्याच्या विविध स्वादांचा आनंद घ्यावा, असे त्यांनी म्हटले.
मा.मंत्री श्री.शंभूराज देसाई म्हणाले की, कोकणच्या ओळख असलेल्या आंब्याला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात आंब्याच्या विविध प्रजाती ‘फार्म टू टेबल’ संकल्पनेतून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत आंब्यांची विक्री होणार असून, कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक उत्पादनेही विक्रीसाठी उपलब्ध राहतील. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. या महोत्सवात आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
महोत्सवादरम्यान कोकणच्या पारंपरिक संस्कृतीची झलक दाखविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये दशावतार, पालखी सोहळा, स्वराज्य आख्यान, कोकण कलेक्टिव्ह बँड तसेच महिलांच्या सन्मानार्थ ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटकांना कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
याशिवाय कुणकेश्वर परिसरातील सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला आणि देवगड किल्ला हे ऐतिहासिक किल्ले पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. तसेच तारकर्ली, मालवण, देवबाग आणि कुणकेश्वर या समुद्रकिनारी स्वच्छता आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत.
विशेषतः तारकर्ली स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. सिंधुदुर्गमध्ये स्कुबा डायव्हिंग, जेट स्कीइंग, बोटिंग आणि स्नॉर्कलिंगसारख्या विविध जलक्रीडांचाही पर्यटकांना आनंद घेता येणार आहे. येथील डॉल्फिन सफारीही विशेष आकर्षण ठरत आहे.
कोकणात पोहोचण्यासाठी पर्यटक मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथून सिंधुदुर्ग चिपी विमानतळ येथे विमानसेवेचा लाभ घेऊ शकतात, चिपी विमानतळ एमटीडीसी कुणकेश्वर रिसॉर्ट पसून साधारण ६० कि. मी अंतरावर आहे. हा विमानतळ कोकण विभागाला देशातील प्रमुख शहरांशी जलद आणि सुलभ हवाई संपर्क उपलब्ध करून देत आहे.
एमटीडीसी कुणकेश्वर रिसॉर्ट कणकवली रेल्वे स्थानकापासून ६० कि. मी अंतरावर असून कोंकण रेल्वेद्वारे भारतातील इतर महत्वाच्या शहरांशी जोडले गेले आहे. तसेच मुंबई आणि पुणे येथून रेल्वे व बससेवेद्वारेही येथे सहज पोहोचता येते.
हा महोत्सव मा.पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई तसेच मा.पर्यटन राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येत आहे. मा.अपर मुख्य सचिव (पर्यटन) श्री.संजय खंदारे(भाप्रसे), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मा. व्यवस्थापकीय संचालक नीलेश र.गटणे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
तसेच महाराष्ट्र पर्यटन विभागाचे उपसचिव श्री. संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल, व्यवस्थापक (प्रसिद्धी) श्रीमती मानसी ताटके आणि प्रादेशिक व्यवस्थापक, रत्नागिरी, श्री.दिपक माने हेही महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. संबंधित विभागीय अधिकारी आणि रिसॉर्ट व्यवस्थापन पथकेही पूर्ण समन्वयाने सहकार्य करत आहेत.
आंबा महोत्सवामुळे शेतकरी आणि उद्योजकांना उत्पादनवाढीसाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन मार्गदर्शकांच्या माध्यमातून परिसरातील विविध पर्यटनस्थळांच्या भेटींचे आयोजनही करण्यात आले आहे.
पर्यटनसमृद्ध कोकणतील नैसर्गिक सौंदर्याचा, कृषीसंपदा आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम अनुभवण्यासाठी ‘आंबा महोत्सव २०२६’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी केले आहे.
शंभूराज देसाई, मा. मंत्री (पर्यटन), महाराष्ट्र राज्य
“‘आंबा महोत्सव २०२६’ मध्ये ‘फार्म टू टेबल’ संकल्पनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून थेट आणलेले ताजे आंबे ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच स्थानिक कोकणी उत्पादनांची विक्री आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोकणची समृद्ध संस्कृती, चव आणि परंपरांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मी करतो.”
संजय खंदारे, मा. अपर मुख्य सचिव, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन
“आंबा महोत्सव २०२६मुळे शेतकरी आणि उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होतील. पर्यटकांसाठी परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल तसेच स्थानिक शेती आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धन व प्रचारालाही मदत होईल.”
निलेश गटणे, मा. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
“‘आंबा महोत्सव २०२६’मध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांना आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याबरोबरच दशावतार, पालखी सोहळा, स्वराज्य आख्यान आणि कोकण कलेक्टिव्ह बँड यांसारख्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव घेण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.”











