काजू पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 02, 2024 11:39 AM
views 44  views

देवगड : वातावरणातील होणारे बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे यावर्षी काजू पिकावर कीडरोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. यावर्षी काजू पीक अत्यल्प आहे. त्यात कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

कोकणातील शेतकऱ्यांची आंबा, काजू ही पिके नगदी उत्पन्न देणारे साधन आहेत. या दोन पिकांवर येथील अर्थकारण अवलंबून आहे. यावर्षी वातावरणातील बदल, लहरी निसर्ग व अवकाळी पाऊस या सर्वांचा परिणाम काजू व आंबा पिकाच्या फलधारणेवर झालेला दिसून येत आहे. त्यामुळेचयावर्षी १५-२० टक्केच पीक आहे. त्यातच काजू पिकावर कीडरोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यात काजू बी च्या मध्यभागी डोळ्याजवळ किडीने शिरकाव केला आहे. त्यामुळे हि काजू बी काळी पडत आहे. 

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

• काजू बोंडूवर प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाँड्डू फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बाजारपेठेतील काजू बीच्या दरात होणारी घसरण काजू पिकाला हमी भाव नाही.

• यामुळेच येथील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. काजू पिकास हमी भाव मिळावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

दिवसेंदिवस बाजारपेठेत काजू बीचे दर कमी होत असून, काजू पिकाला हमी भाव नसल्यामुळे शेतकरीवर्गात मोठी नाराजी आहे. काजूबागेची साफसफाई, काजूच्या झाडांना खते, फवारणीसाठी महागडी औषधे, कामगारांची मजुरी यासाठी शेतकऱ्यांना भरमसाट खर्च येतो. त्यातच काजूचे उत्पादन अत्यल्प असल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. काजू बीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांचे नुकसान करतोय.