अभ्यासात चिकाटी - सातत्य ठेवा : प्रा. अमेय महाजन

Edited by: विनायक गावस
Published on: August 09, 2023 16:36 PM
views 84  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय  व  मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन कक्षाच्या वतीने "आम्ही अधिकारी होणारच" ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे  कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर, प्रमुख मार्गदर्शक प्रा.अमेय सुनिल महाजन, डाॅ अमेय देसाई,  करियर मार्गदर्शन कक्षाच्या समन्वयक प्रा. नीलम धुरी,सदस्य प्रा. व्ही जी बर्वे, डॉ. यु आर पवार, डॉ. ए पी निकुम,श्री चव्हाण, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग,  शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. सौ नीलम धुरी यांनी करून दिला . प्रमुख मार्गदर्शक प्रा. अमेय महाजन यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्वतःची स्पर्धा करा  व स्पर्धा  परीक्षांसाठी चा अभ्यासक्रम प्रामाणिकपणे शिका , तो चिकाटीने पूर्ण करा. अभ्यासामध्ये चिकाटी, सातत्य असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळणारच. आपण मेहनत केली तर तलाठी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. समाजाशी आपली नाळ जोडली आहे. मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे ही भावना मनाची बाळगून स्पर्धा परीक्षेसाठी  सतत वाचन करा ,संवेदनशील बना. संशोधनाला प्रेरणा देणारे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे सांगीतले.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज लखमसावंत भोंसले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की स्वतःचे व्हिजन ठेवा. पुस्तकांचे वाचन करा. त्यामुळे इतरांचे अनुभव समजतात.स्वतःच्या चुका लक्षात येतात.त्यातून उपाय सुचतात .

   नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना सर्व शाखेतील आवडीच्या विषयांचा अभ्यास करता येईल.विद्यार्थ्यांनी मल्टी स्किल वाढवावे. मोबाईलचा वापर अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी करावा. संशोधक वृत्ती वाढवुन स्पर्धा परीक्षा किंवा दुसरे काही करायचं असेल तर ते करा. आवडीच्या क्षेत्रात करिअर करा व यशस्वी व्हा. सुत्रसंचालन व आभार प्रा. व्ही जी बर्वे यांनी मानले.