
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायत अज्ञात चोरट्यांनी फोडून सामानाची नासधुस केलेली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तूची चोरी झाल्या नसल्याने निदर्शनास आले आहे. यामुळे ही ग्रामपंचायत चोरीच्या की अन्य कोणत्या उद्देशाने फोडली याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
आज सकाळी पेंडूर ग्रामपंचायत ही अज्ञातांनी फोडली असल्याचे निदर्शनास आले. ग्रामपंचायतच्या मागील बाजूने या अज्ञातांनी ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करून पेंडुर ग्रामपंचायत मधील पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामपंचायतचा हॉल फोडून त्यातील सामान व कागदपत्रे विस्कटून टाकलेली आहेत. याबाबत पेंडूर सरपंच गीतांजली कांबळी व सदस्य निलेश वैद्य यांनी माहिती दिली. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात असलेले संगणक, बॅटरी आदी वस्तू जशाच तशा असल्याने ही ग्रामपंचायत कोणत्या चोरीच्या हेतूने की अन्य कोणत्या हेतूने फोडली याबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.