आगामी निवडणुकीत राजेंच्या रूपानं पाटेकराचा झेंडा !

▪️ माजी आमदार शिवराम दळवींच प्रतिपादन ▪️ देवघरात श्रावण समाप्ती सोहळा उत्साहात !
Edited by: विनायक गांवस
Published on: September 02, 2024 13:15 PM
views 113  views

सावंतवाडी : ते राजे आहेत आणि मी सैनिक, पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे. अन् या पुढेही चालत रहाणार आहे‌. आगामी निवडणुकीत युवराज लखमराजे भोंसले हे उमेदवार असणार आहेत. झेंडा कोणताही असूदेत पाटेकराचा झेंडा राजेंचाच असणार असं प्रतिपादन सावंतवाडीचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी केले. श्रावण मास समाप्ती सोहळ्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात कोकणसादशी बोलताना त्यांनी हे विधान केले. राजवाडा येथील देवघरात माजी आमदार दळवी यांच्या माध्यमातून समाप्ती सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते.‌

संस्थानकालीन श्री देव पाटेकर देवघरात श्रावणी मास समाप्ती सोहळा गेली अनेक वर्ष माजी आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातून केला जातो.‌ यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व प्रसाद सोहळा आयोजित करण्यात येतो. मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, माजी आमदार शिवराम दळवी, माजी आमदार परशुराम उपरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहत देव पाटेकराचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार शिवराम दळवी म्हणाले, राजेसाहेब शिवरामराजे, राजमाता नंतर आता युवराज लखमराजेंच्या मान्यतेनुसार श्रावणी समाप्ती सोहळा आयोजित केला आहे. मध्यंतरी कोरोनात यात खंड पडला होता. यावर्षीपासून पुन्हा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आजच्या दिवशी पक्ष, झेंडा, राजकारण बाजूला ठेवून देवाकडे सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना केली. सर्व जनतेला सुख, समृद्ध दे अशी प्रार्थना केली. राजकीय प्रश्न विचारला असता माजी आमदार दळवी म्हणाले, ते राजे आहेत आणि मी सैनिक. पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे अन् पुढेही रहाणार आहे‌. आगामी निवडणुकीत युवराज लखमराजे हेच उमेदवार असणार आहेत. झेंडा कोणताही असु देत पाटेकराचा झेंडा राजेंचाच असणार अस प्रतिपादन सावंतवाडीचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी केले.

दरम्यान, शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त मोठा उत्सव श्री देव पाटेश्वर चरणी होतो. कोरोनाकाळात यात खंड पडला होता. मात्र, यावर्षीपासून पुन्हा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. माजी आमदार शिवराम दळवी यांच सहकार्य आम्हाला नेहमीच असतं असं मत युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केले. यावेळी माजी आमदार शिवराम दळवी, माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद सावंत, भाई देऊलकर, अँड. नकुल पार्सेकर, गुणाजी गावडे, मोरोपंत पोतनीस,  एल. एम. सावंत आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दुपारी मळगाव येथील भजन मंडळांच सुश्राव्य भजन झाले. विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे ऐतिहासिक राजवाडा परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.