
सावंतवाडी : रा. प. महामंडळाच्या सर्व बसेस पेडणे बस स्थानकावरून जात असल्याने सकाळच्यावेळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना आपापल्या कामास वेळेत पोहोचता येत नाही. पेडणे येथील रस्ता अरूंद व एकेरी मार्ग असल्याने समोरून बस आली की साईड देईपर्यंत उशीर होत असून पुन्हा मुख्य हायवेवर यायला बराच वेळ होत असतो. पेडणे येथून प्रवाशांना इतर बसेसची सोय असल्याने एस टी बसचे उत्पन्न वाढत नाही. राज्य परिवहन महामंडळ कणकवली यांनी त्वरित लक्ष घालून सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ५ नंतर च्या एसटी बस सरळमार्गे सोडून नोकरी निमित्त कामावर जाणाऱ्या प्रवाशांना कामावर व घरी वेळेवर पोहोचता येईल याची काळजी घ्यावी व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.