वेंगुर्ल्यात नाट्यरसिकांसाठी पर्वणी

१२ ते १६ डिसेंबर रोजी होणार राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी
Edited by:
Published on: December 05, 2023 19:41 PM
views 174  views

वेंगुर्ले : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धा २०२३-२४ आयोजित करण्यात आली आहे. या नाटय़स्पर्धे अंतर्गत माझा वेंगुर्ला यांच्या सहकार्याने येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ७ ते १० या वेळेत प्राथमिक फेरीत ५ दर्जेदार नाटके सादर  होणार असून वेंगुर्लेतील नाट्य रसिकांसाठी हि एक पर्वणी ठरणार असल्याची माहिती या स्पर्धेचे समन्वयक व माझा वेंगुलाचे प्रशांत आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या नाटयस्पर्धे विषयी माहिती देण्यासाटी माझा वेंगुला तर्फे येथील लोकमान्य सोसायटीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माझा वेंगुलाचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव राजन गावडे, सदस्य तथा माजी नगराध्यक्ष राजन गिरप, सचिन वालावलकर, अमृत काणेकर, यासिर माकानदार आदी उपस्थित होते.

यावेळी प्रशांत आपटे पुढे म्हणाले की, वेंगुर्लेचे सुपुत्र नाटककार मधुसुदन कालेलकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी वेंगुर्ले येथे व्हाव्यात यासाठी माझा वेंगुर्ला यांनी केलेल्या प्रयत्नामुळे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून त्यांना माझा वेंगुर्ला तर्फे पत्र दिले होते. माझा वेंगुर्लाचे सचिन वालावलकर, राजन गिरप यांनी  त्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे प्रथमच वेंगुर्लेत राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी होत आहे. यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे. तर या नाटकांसाठी तिकीटांचे १२ व १५ रुपये हे अत्यंत कमी शासकीय दर ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या प्राथमिक फेरीत मंगळवार १२ डिसेंबर रोजी विजय तेंडुलकर लिखित व अशोक तेंडुलकर दिग्दर्शित इंद्रधनू कलामंच दाभोली यांचा "अशी पाखरे येती'', बुधवार १३ डिसेंबर रोजी प्रशांत माणगावकर लिखित व सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर दिग्दर्शित कलावलय वेंगुर्ले यांचा ``सावरबेट'', गुरुवार १४ डिसेंबर रोजी जयवंत दळवी लिखित व रमेश नार्वेकर दिग्दर्शित जीवनदायी विकास संस्था वेंगुर्ले यांचा "कालचक्र", शुक्रवार १५ डिसेंबर रोजी प्रविण दवणे लिखित व स्वानंद सामंत दिग्दर्शित सिध्दांत फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांचा ``प्रिय पपा''  व  शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी ज्ञानवर्धिनी परूळे यांची ‘ती सात वर्षे‘ ही नाटके सादर होणार असल्याची माहिती श्री आपटे यांनी दिली आहे. तर या नाटकाचा मोठ्या प्रमाणात नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय तर्फे माझा वेंगुर्ला संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या अगोदर ही नाटक मालवण व चिपळूण याठिकाणी होत होती. आता पण त्याठिकाणी होत आहेत मात्र यात एक केंद्र वेंगुर्ला वाढवण्यात आले आहे. वेंगुर्ल्यात सुसज्ज असं मधुसूदन कालेलकर नाट्यगृह  नगरपरिषदेने उपलब्ध करून दिले आहे. आता वेंगुर्ल्यात या नाटकांना प्रतिसाद मिळाला तर भविष्यात याठिकाणी दरवर्षी अशी नाटके सादर होणार आहेत. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून माझा वेंगुर्ला यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचे यावेळी सचिन वालावलकर यांनी सांगितले.