'तो' चेक कुणाच्या खात्यातून दिला ?

केसरकरांना उपरकरांचा सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 09:48 AM
views 485  views

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर हवं ते विधान करतात. नुकतच त्यांनी मंत्रीपद मिळवण्यासाठी १ कोटीचा चेक ठाकरेंना दिला अस विधान केल. मधल्या काळात हेच केसरकर आपली प्रॉपर्टी विकली आहे, आर्थिक अडचणीत आहे अस सांगत होते. तेच केसरकर एक कोटीचा चेक देत असतील तर तो कुणाच्या नावाचा दिला ? कुणाच्या खात्यातून दिला ? ते जाहीर कराव असं आव्हान माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी दिलं आहे‌.


ते म्हणाले, एक कोटीचा चेक जर स्वतःच्या खात्यातून दिला तर इनकम टॅक्सला त्याची माहिती दिली होती का ? ते केसरकरांनी सांगाव, जनतेला त्याची माहिती द्यावी.  लाच देणारा अन लाच घेणारा हे दोन्ही गुन्हेगार आहे. पदासाठी कुणी पैशांची देवाण घेवाण करत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. राणेंवर टीका करणारे केसरकर आज त्यांची बाजू घेत आहेत. विसंगत माहिती देऊन केसरकर जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात दिलेल्या आश्वासनांच काय झाले ? हे त्यांनी सांगाव. त्यांच्या मंत्रीपदाचा शुन्य उपयोग जिल्ह्यासाठी आहे. त्यामुळे तुमच्या आश्वासनांच काय झाले ते आधी सांगा. विकास कुठे अडलाय ? ते सांगा असं परशुराम उपरकर म्हणाले. तर दोन कोटी खर्च झालेल्या सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाच्या चौकशीची मागणी आपण करणार आहे. जिल्ह्यात कुणाचा लक्ष नाही. पालकमंत्र्यांचही लक्ष प्रशासनावर नाही. जमीन व्यवहार करण्यात व्यस्त असतात अशी टीका जीजी उपरकर यांनी केली. याप्रसंगी आशिष सुभेदार उपस्थित होते.