बदलत्या अभ्यास पद्धती नुसार पालकांचं प्रबोधन आवश्यक : डॉ. रुपेश पाटकर

आजचा मुलांचा अभ्यास आणि पालकांची जबाबदारी या विषयावर आडाळी येथे पालकांची कार्यशाळा
Edited by: संदीप देसाई
Published on: July 30, 2023 19:36 PM
views 159  views

दोडामार्ग : बदलत्या अभ्यास पद्धती नुसार पालकांचं प्रबोधन व्हावं जेणेकरून शिक्षणाचा उपयोग मुलांच्या क्षमता विकसित करण्यासाठी होईल. मुलांना त्यांच्यातील क्षमता ओळखण्यासाठी पालकांनीही जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.असे मत मनोविकार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी मांडले.

ग्लोब ट्रस्ट आणि आडाळी शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळेत 'आजच्या मुलांचा अभ्यास आणि पालकांची जबाबदारी ' या विषयावर नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.  तीसहून अधिक पालक कार्यशाळेत सहभागी झाले. डॉ. पाटकर यांनी पालकांना मार्गदर्शन केले.

यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष तथा सरपंच पराग गांवकर, मुख्याध्यापक सायली देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेघा गांवकर, उपाध्यक्ष आरती गांवकर, ग्रामपंचायत सदस्य सानिका गांवकर, विशाखा गांवकर, अमोल परब, निशा गांवकर,माजी सरपंच निळकंठ गांवकर, ग्रामपंचायत माजी सदस्य विशाखा गांवकर आदी उपस्थित होते.

मुलांच्या बदललेल्या अभ्यास पद्धती नुसार पालकांचं प्रबोधन व्हावं म्हणून या कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते. 

डॉ. पाटकर म्हणाले ' मुळात शिक्षणासाठी मातृभाषा हेच माध्यम प्रभावी असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहॆ. संकल्पना स्पष्ट होणे हा शिक्षणाचा उद्देश असतो. मुलामध्ये विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आपली धडपड असायला हवी. शिवाय भावनिक बुद्धिमत्ता जपणे हे आजचे आव्हान आहॆ. त्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक भावनिकतेचा संस्कार करायला हवा. सरधोपटपणे मुलांकडे नं पाहता त्यांच्यातील विशिष्ट क्षमतांचा शोध आपण घ्यायला हवा.

पराग गांवकर यांनी प्रस्ताविकात  म्हटले, की मुलांवरचे संस्कार हे जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहेत. पूर्वी सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे मुलावर संस्कार होत असत. आता मात्र पालकांना सद्य परिस्थितीचे आकलन करून घेऊन संस्कार करावे लागतील. त्यासाठी म्हणून ही कार्यशाळा आहॆ. पालक व मुलांसाठी दरमहिन्याला एक कार्यशाळा होणार आहॆ.  सौ. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष उदय गांवकर, दीपिका सावंत यांनी रानफुलांचा गुच्छ देऊन स्वागत केले.