शिकावू डॉक्टरांचा सिंधुदुर्गवासीयांना उपयोग काय? : उपरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: August 26, 2025 15:05 PM
views 87  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह््याची बिघडलेली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे प्रयत्नांमुळे ८७ डॉक्टर आले. मात्र, डॉक्टर शिकावू असून ते केवळ प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करण्यासाठी जिल्ह््यात आले आहेत. या डॉक्टरांचा सिंधुदुर्गवासीयांना उपयोग काय? मुंबई ते विजयदुर्ग जल रो-रो गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार करणार होता, त्याचे काय झाले? मुंबई ते चिपी विमानसेवा पूर्ववत का झाली नाही, असे सवाल शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे हे सध्या गायब आहेत, अशी टीका त्यांनी केली.

येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. उपरकर म्हणाले, गणेशोत्सवापूर्वी मुंबई ते विजयदुर्गपर्यंत जल रो-रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती, ही जल रो-रो सेवचे नेमके घोडे कुठे अडले ? २५ आॅगस्टपर्यंत मुंबई-गोवा महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावे, असे आदेश पालकमंत्री संबंधित अधिकाºयांना दिले. मात्र, २५ आॅगस्टपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे यंदा चाकरमान्यांसह स्थानिकांना गणपतीचे आगमन खड्डयांतून करावे लागणार आहे, ही सिंधुदुर्गवासीयांची शोकांतिका आहे, असा आरोप उपरकर यांनी केला. 

सिंधुदुर्ग जिल्ह््यातील आरोग्य व्यवस्था कोमात गेली आहे. त्यामुळे दररोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयांमधून रुग्णांना गोवा-बांबुळी येथील जीएमसीमध्ये रेफर केले जात आहेत. सिंधुदुर्गात आरोग्यसह अन्य व्यवस्थांची दुरवस्था झाली. या स्थितीला महायुती सरकार व  पालकमंत्री जबाबदार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांचा विषय केंद्र सरकारच्या आखत्यारितील आहे. मात्र, खासदार गेले काही महिने गायब आहेत, असेही उपरकर म्हणाले.

महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, आरोग्य व्यवस्थेचे बिघडलेले आरोग्य यासह अन्य प्रश्न सोडविण्याबाबत सरकार व पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. लाडक्या बहणींसह अन्य योजनांचे पैसे येणे सरकारने बंद केले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांनी आगामी निवडणुकांमध्ये महायुती सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन उपरकर यांनी केले.