विनापरवाना अवजड वाहतुकीवर कारवाई न केल्यास आंदोलन

परशुराम उपरकर यांचा इशारा
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 31, 2024 07:11 AM
views 539  views

कणकवली : उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सध्या सिंधुदुर्ग जिल्हयात सुरु असलेल्या ओव्हरलोड, अवैध प्रवासी वाहतूक तसेच त्या गाड्यातून होणारी अवैध मालवाहतूक व आंबोली घाटात अवजड वाहतुकीला बंदी असतानाही मोठ्या गाड्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. सिंधुदुर्ग आरटीओ विभागात हप्तेखोरीचे प्रकार सुरुच असून फक्त दंडात्मक कारवाईचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग नाही तर जिल्हयात राजरोसपणे सुरु असलेल्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करणे देखील या विभागाचे काम असल्याचे खडेबोल माजी आमदार परशुराम उर्फ जी. जी. उपरकर यांनी उपप्रादेशिक अधिकारी नंदकिशोर काळे यांना सुनावले. दरम्यान येत्या १५ दिवसांत अवैध विनापरवाना, अवजड वाहतुकीवर तसेच खाजगी बस मधून होत असलेल्या लगेच वाहतुकीवर कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर मोठे आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला.

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी गुरुवारी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हयात सुरु असलेल्या बेकायदेशीर आणि अवजड विना परवाना वाहतुकीबाबत तक्रारीचां पाढाच वाचला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, राजेश टंगसाळी, मंदार नाईक, अप्पा मांजरेकर, चालक युनियन चे अध्यक्ष विजय जांभळे, आबा चिपकर, स्वप्नील जाधव, रमेश शेळके, राहूल गावकर, अंकुश बोवलेकर, गितेश मळगावकर, नंदू परब आदी उपस्थित होते. यावेळी श्री. उपरकर यांनी आक्रमक भुमिका घेताना पुणे पोर्श कार प्रकरण हे बेकायदेशीर वाहतुकीचाच प्रकार असून अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जिव घेतला त्याची आठवण करुन देत जिल्हयात देखील अशा प्रकारे अल्पवयीन मुलांकडून वाहने चालवून अपघाताचे प्रकार होत आहेत ते रोखणे आरटीओचे काम आहे. अल्पवयीन मुले दुचाकी, चारचाकी गाड्या चालवत असून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. खाजगी बस गाडयांवर कमी वयाचे परप्रांतीय चालक भरले जातात तर रात्रीच्यावेळी मद्य प्राशन करुन खाजगी प्रवासी बसचे चालक गाडया चालवताना हमखास आढळून येतात परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. सिझनमध्ये खाजगी प्रवासी बसवाले क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरतात त्यामुळे कित्येवेळा अपघात घडले आहेत. त्यावरही कोणतीही कारवाई होत नाही. आंबोली घाटात अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली तरी रात्रीच्या वेळी सरीस चिरीमिरी घेवून गाड्या सोडण्याचे प्रकार सुरु आहेत याकडे आरटीओ विभाग जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप केला. जिल्हयात अवजड वाहतुक करणा-या गाड्यांचे विमा, पासिंग, परमिट, परवाना असल्याबाबत कागदपत्र तपासणी होताना दिसत नाही. त्यामुळे आरटीओ विभाग हा हप्तेखोरीचा विभाग बनला आहे असा आरोप उपरकर यांनी केला.

हायवेच्या निकृष्ठ व नियमबाहय कामामुळे कित्येकवेळा अपघात होत आहेत परंतु संबंधीत हायवे ठेकेदाराला एकही नोटीस बजावण्यात आलेली नाही. ही शोकांतीका आहे वाहतुक तसेच गाडयांचे लायसन, परवाने, परमीट काढण्यासाठी येणा-या ग्राहकांची एजंटांमार्फत लूट सुरु असून त्यातील काही हप्ते हे परिवहन विभागाच्या अधिका-यांनाही जात आहेत त्यामुळे हा विभाग भ्रष्टाचाराचा कुरण बनला आहे असा आरोप करत येत्या पंधरा दिवसांत या सर्व तक्रारींवर कारवाई न झाल्यास सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपरकर यांनी दिला.