
वेंगुर्ला : ‘गरूडझेप‘ महोत्सवांतर्गत जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने शनिवारी घेण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय ग्रुपडान्स स्पर्धेत परबवाडा सी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. तर यानंतर महिलांसाठी आयोजित केलेल्या होममिनिस्टर स्पर्धेत निहारीका होळकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या. वेंगुर्ला येथे जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाचा ‘गरूडझेप महोत्सव‘ सुरू असून या अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. शनिवारी नायरा पेट्रोल पंपानजिक संपन्न झालेल्या तालुकास्तरीय ग्रुपडान्स स्पर्धेत परबवाडा सी ग्रुपने प्रथम, वेंगुर्ला शाळा नं.१ने द्वितीय तर वेंगुर्ला शाळा नं.४ ने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण रेश्मा वरसकर आणि उर्मिला पेडणेकर यांनी केले. विजेत्यांना शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि वेंगुर्ला शहरप्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते रोख रक्कम तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी वासुदेव परब, राजू परब, आनंद रेडकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि शिक्षक व पालक उपस्थित होते.
यानंतर महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती. यातील विविध स्पर्धांनी उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेत निहारिका होळकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर अदिती तावडे-द्वितीय, मेघना राऊळ-तृतीय, मेधा वेंगुर्लेकर-चतुर्थ, अनुराधा तेरेखोलकर-पाचवा आणि गोपिका राऊळ यांनी सहावा क्रमांक पटकाविला. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे निवेदन शुभम धुरी यांनी केले.