
कुडाळ : पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाड वैद्य श्री. यशवंत पांडुरंग मेस्त्री यांचे शनिवारी, २ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
जीवन आणि कार्य :
यशवंत मेस्त्री हे त्यांच्या हाड सांधण्याच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. शरीरातील तुटलेली हाडे असो किंवा मणक्यातील गॅप भरून काढणे असो, ते यावर पारंपरिक पद्धतीचे उपचार करायचे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरून आलेल्या हजारो रुग्णांना कमी खर्चात बरे केले. समाजातील गरजू लोकांसाठी ते नेहमीच मदतीला धावून जायचे.
त्यांना भजन आणि आरत्यांमध्ये विशेष रुची होती. दर श्रावण महिन्यात ते विविध ग्रंथांची पारायणे आवर्जून करायचे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, दोन मुली, नातवंडे, तीन भाऊ, वहिनी आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पांग्रड गावाने एक दिलदार व्यक्तिमत्व गमावले आहे.
यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र श्री. मोहन मेस्त्री, जे पणदूर येथील 'ओम आयुर्वेदा उपचार केंद्रा'चे संचालक आहेत, त्यांनी वडिलांचा हाड सांधण्याचा वारसा पुढे चालवला आहे. ते स्वतः सुप्रसिद्ध मृदुंगमणी आणि पखवाज वादक आहेत, आणि 'श्री गणेश मृदुंग वादन क्लास'चे संचालकही आहेत.