
सावंतवाडी : गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे येथील आगळ्यावेगळ्या 'नव्या' चा अर्थात सामूहिक भात कापणीचा शुभारंभ रविवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने करण्यात आला. आंब्याची पाने, गंध, हळद, पिंजर या नव्याला लावून हे नवे तोरणाच्या स्वरूपात आकर्षक सजवून घराच्या उंबरठ्यावर लावण्यात आले. यानिमित्त गावातील प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर या नव्याच्या तोरणाचा साज सजलेला होता.
या नव्याद्वारे ओटवणे गावात निसर्गासह ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालण्याची प्रथा आहे. दरवर्षी पूर्व नक्षत्रात गणेश चतुर्थीत नवे साजरे करण्याची प्रथा आहे. श्रावणानंतर शेत पीक बहरात येऊन सर्वत्र हिरवीगार शेती दृष्टीस पडते. शेतकऱ्याच्या दृष्टीने हा सुगीचा काळ असून शेतात काबाडकष्ट करून पिकविलेले धान्य पदरी पाडण्यासाठी नवे केले जाते. सकाळीच कुळघराकडे दवंडी देण्यात आली. त्यानंतर कुळ घराकडे ग्रामस्थ जमा झाल्यानंतर सर्वजण सवाद्य नवे साजरे करण्याच्या ठिकाणी आंबेडकरनगर नजिक गेले. नवे साजरे करण्याच्या ठिकाणी सर्वजण आल्यानंतर पुरोहिताच्या मंत्रोच्चारात भात पिकाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर ढोलांच्या गजरात हातातोंडाशी आलेल्या भातपिकाच्या संवर्धनासाठी आणि सदरचे भरघोस पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडू दे असे गाऱ्हाणे घालण्यात आले.यावेळी भात कापणी करून कापलेले नवे कापडात लपेटून ग्रामस्थ पुन्हा सवाद्य कुळ घराकडे सवाद्य निघाले. नंतर हे नवे घेऊन ग्रामस्थ आपल्या घरी मार्गस्थ झाले. नवे घरी आणल्यानंतर त्याची उंबरठ्यावर पूजा करूनच घरात आणण्यात आले.










