ओटवणेच्या शाही दसरोत्सवास प्रारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: October 11, 2024 14:04 PM
views 325  views

सावंतवाडी : सुमारे साडे चारशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावचा प्रसिध्द शाही दसरोत्सवास प्रारंभ झाला. भाविकांनी सोने म्हणून आपट्याची पाने लुटली. मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. यावेळी दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा, बेळगाव कोल्हापूर परिसरातून भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळाली.


दोन दिवस चालणाऱ्या या दसरोत्सवाची सांगता शनिवारी सायंकाळी होणार आहे. ओटवणे गावचा संस्थानकालीन दसरा उत्सव खंडेनवमी आणि विजयादशमी असा दोन दिवस साजरा केला जातो. दसरोत्सवात या देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साज चढवण्याची प्रथा आहे. या देवस्थानची तिन्ही तरंगे सोन्याची आहेत. सावंतवाडी महसूल खात्याच्या उपकोषागारात असलेला हा ऐतिहासिक सोनेरी ठेवा खंडे नवमीला रवळनाथ मंदिरात आणण्यात आला. दुपारी रवळनाथासह या देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजविल्यानंतर तिन्ही तरंगाना सप्त पितांबरीच्या वस्त्रांनी सजविण्यात आले. सायंकाळी सुवर्ण तरंगासह सवाद्य पालखी प्रदक्षिणा घातल्यानंतर शिव लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर भाविकांनी सोने म्हणून आपट्याची पाने लुटल्यानंतर तिन्ही तरंग देवतांच्या साक्षीने महिलांनी क्लेशपीडा परिहार्थ अग्निस्नान झालं. उद्या सायंकाळी सुवर्ण तरंगाची खेम सावंत समाधी भेट व गाव रखवाल कौलाने या दोन दिवसांच्या दसरोत्सवाची सांगता होणार आहे. या दसरोत्सवात वर्षातून एकदाच दर्शन होणाऱ्या सुवर्ण तरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा, बेळगाव कोल्हापूर परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होते.