
मालवण : शहरातील धुरीवाडा काजू फॅक्टरी महापुरुष ते चिवला बीच या अर्धा किलोमीटर रस्त्याची गेल्या सात-आठ वर्षात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे महिन्याभरात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा आम्ही स्वखर्चाने रस्त्यावर खडी, डांबर ओतू असा इशारा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी निवेदनाद्वारे पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिला आहे.
धुरीवाडा काजू फॅक्टरी महापुरुष ते चिवला बीच या अर्धा किलोमीटर रस्त्याची गेल्या सात आठ वर्षात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी सायकल व मासेमारी करणारे मच्छीमार बांधव दुचाकी तसेच पर्यटन क्षेत्र असल्याने पर्यटक वाहने घेऊन ये– जा करत असतात. परिणामी अनेकदा रस्त्यावर सायकल, दुचाकी वाहन स्लिप होण्याचे व त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या परिसरात राहणाऱ्या तसेच ये जा करणाऱ्या नागरिकांना या खराब रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी याबाबत पालिकेचे सातत्याने लक्ष वेधले आहे. मात्र पालिकेने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिक महिला, लहान, मुले या सर्वांना यामुळे तेथून पायी ये जा करताना देखील त्रास सहन करावा लागत आहे. आपण स्थानिक नागरिकांसोबत या रस्त्याची पाहणी केली असता रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालिकेने महिन्याभरात या रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा जनतेला होणाऱ्या त्रासा पायी आम्ही स्वखर्चातून या ठिकाणी खडी, डांबर ओतू असा इशाराही श्री. मोंडकर यांनी दिला आहे.