...अन्यथा 'ते' निकृष्ठ होत असलेले काम बंद पाडू ! - मनसेचा 'साबां'ला सज्जड इशारा

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 01, 2023 15:41 PM
views 163  views

सावंतवाडी : संस्थानकालीन मोती तलावाच्या कोसळलेल्या कठड्याचे सुरु असलेले निकृष्ट पद्धतीने सुरु असून कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणताही अधिकारी किंवा सुपरवायझरही उपस्थित राहत नाहीत, त्यामुळे ते काम दर्जाहीन पद्धतीने होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे. अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून हे काम निविदेमध्ये समाविष्ट पद्धतीने करुन घ्यावे, अन्यथा काम बंद पाडू, असा इशाराही मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला आहे.

 सावंतवाडी शहरातील मोती तलावात साचलेला गाळ काढण्यात येत असताना तलावाचा संरक्षक कठडा कोसळला. मनसेने देखील नव्याने कठडा उभारण्याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यानुसार सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाचे लक्षही वेधले. नंतर नागरिकांच्या सततच्या मागणीनंतर प्रशासनाने हे काम हाती घेतले होते. मात्र गाळ काढण्याचे काम सुरू असताना जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीला धोका पोहोचून ती कोसळली होती.

सद्य:स्थितीत ही कोसळलेली भिंत हटवून ती नव्याने बांधण्यात येत आहे. त्यासाठी दीड कोटी रूपयांचा निधीही मंजूर असून पुणे येथील कंपनी हे काम गेले काही दिवस करीत आहे. मात्र, हे काम होत असताना त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी उपस्थित असणे गरजेचे असतानाही या ठिकाणी बांधकाम विभागाचा कोणीही अधिकारी उपस्थित राहत नाही. खोदलेल्या ठिकाणी मोठे दगड घालून चांगले पीसीसी वर्क करण्याची गरज असताना खोदलेल्या ठिकाणी पाण्यावरच माती टाकून काँक्रीट ओतून काम रेटण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदाराकडून सुरू आहे. दिवसाढवळ्या शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जात असून याला साबां विभागाचे अधिकारीच सर्वस्वी जबाबदार आहेत. सध्या संरक्षक भिंत उभारण्यात आल्यानंतर त्याला पाणी मारण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर जबाबदार प्रशासनाकडून त्या ठिकाणी डोळे झाक होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांमधून नाराजी दिसत आहे. बांधकाम विभागाचा जबाबदार अधिकारीच उपस्थित राहत नसल्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरु आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च होणार असल्याने या भिंतीचे दर्जेदार होणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी दर्जाहीन काम झाल्यास भविष्यात पुन्हा कठडा कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी या कामाकडे जातीने लक्ष देऊन हे काम दर्जेदार करून घ्यावे. तसेच त्या ठिकाणी बांधकामचा जबाबदार अधिकारी तैनात ठेवून त्यांच्या देखरेखीखाली हे काम

व्हावे, अन्यथा नागरिकांना घेऊन सदरचे काम बंद पाडण्यात येईल.

कठड्याचे काम दर्जेदार झाले पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणताही धोका नजीकच्या महामार्गाला होता नये. काम करताना मुळातच चुकीच्या पद्धतीने आणि दर्जाहीन झाल्यास त्याचा परिणाम काही वर्षांनी दिसून येऊ शकतो. त्यामुळे आत्ताच सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि स्थानिक नगरपालिका प्रशासनाने याकडे जातीनिशी लक्ष घालावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बांधण्यात आलेल्या भिंतीच्या ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात येत आहे. मुळात तिथे दगड व माती असा भराव टाकणे आवश्यक आहे. या सर्व बाबींची पूर्तता करावी, अन्यथा याप्रश्नी आंदोलन उभारू, असा इशारा मनसेने दिला आहे.