....अन्यथा रक्ताचं आंदोलन !

रक्तपुरवठा सेवा शुल्कवाढीवरून युवा रक्तदात्यांचा इशारा
Edited by: विनायक गांवस
Published on: March 08, 2023 14:55 PM
views 272  views

सावंतवाडी : राज्य सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय रक्त पेढ्यांमार्फत खाजगी रूग्णालयात केल्या जाणाऱ्या रक्त पुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना ही सेवा मोफतच मिळणार आहे. मात्र, खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांना शासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा दर ४५० होता तो दर आता ११०० रु. करण्यात आल्याने आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्याचबरोबर रेड सेल, फ्रेश फ्रोझेन, प्लास्मा व इतर रक्तघटकांचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात असणारा तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव व रिक्त जागांमुळे चांगले उपचार घेण्यासाठी खाजगी रूग्णालयात जात उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या दरवाढीचा फटका बसणार आहे.  शासनाने याचा विचार करून सदर दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केली आहे. जर दरवाढ रद्द झाली नाही तर रक्ताचे आंदोलन करण्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेने दिला आहे.

दरम्यान, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने लक्ष वेधले आहे. यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या  ०५.०९ १९९९ या शासन निणायानुसार ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथील रक्तपेढी लोकाग्रहास्तव उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग यांचेकडे स्थलांतरित करण्यात आली. मात्र पढे स्थलांतरित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही पद रिक्त असल्याने रक्तदान शिबीरासह अतिगंभीर परिस्थितीत रुग्णांना रक्ताची आवश्यकता असताना रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे.

 रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याने शिबीराच्या माध्यमातून रक्तसंकलन करायचे झाल्यास रक्तपेढीतील रिक्त पदांमुळे रक्तदान शिबीरासाठी अनेक संघटना व रक्तदाते इच्छुक असून देखील शिबीर घेण शक्य होत नाही आहे. रिक्त पदांत रक्तसंक्रमण अधिकारी, वर्ग ३ साठी मंजूर असणारे २ पद, रक्तपेढी तंत्रज्ञ, वर्ग ४ मंजूर ४ पदापैकी ३ रिक्त, अधिपरिचारिका, वर्ग ४ मंजूर असणारे २ पद, रक्तपेढी परिचारक वर्ग ५ मंजूर ४ पैकी ३ व सफाई कामगार वर्ग. ५ मंजूर २ पद अशी मंजूर ९ पदापैकी तब्बल ८ पद रिक्त आहेत. तर केवळ ३ लोकांच्या जीवावर रक्तपेढी सुरू आहे. त्यामुळे ही रक्तपेढी बंद पडण्याचा मार्गावर असून तसं झाल्यास रक्ताअभवी शेकडो जणांना आपले प्राण गमवायची वेळ येईल. त्यात विशेष म्हणजे गरोदर महिलांची प्रसूती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते. लाखो गोरगरीब रुग्ण उप जिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहेत. त्यामुळे रुग्णालयात रक्ताची तातडीने आवश्यकता भासते. अशावेळी रक्तपेढी असूनही इतरत्र वणवण करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येते. आपण स्वतः रक्तदानाच्या चळवळीत कार्यरत आहात. बहुमोल असं योगदान दिलेल आहात अन् आजही देत आहात. आपणास यासंबंधीत सर्वबाबी ज्ञात आहेत. त्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या मंजूर पदापैकी रिक्त असणारी ८ पदे तातडीनं भरण्याचे आदेश संबंधीतांना देण्यात यावेत अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेन केली आहे.‌ यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, राघवेंद्र चितारी, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, वैभव दळवी, प्रथमेश प्रभू आदी उपस्थित होते.