
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षेचे कवच उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्यू झाल्यास १ कोटी रुपयांचे विमा संरक्षण तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन खाते एसबीआयमध्ये असणे आवश्यक राहणार आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षेचे कवच देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, एसबीआयतर्फे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आरोग्य विमा पॉलिसीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेत कर्मचाऱ्याला वार्षिक ९ हजार रुपयांचा हप्ता भरावा लागणार असून, त्याअंतर्गत ५५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचा खर्च मिळणार आहे. रुग्णालयात दाखल होणे, औषधोपचार, वैद्यकीय खर्च आदींचा यात समावेश असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यासह कुटुंबातील चार सदस्यांनाही मिळणार असून ही पॉलिसी ऐच्छिक स्वरूपाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यासंदर्भातील सामंजस्य करार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच एसबीआय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष दादा साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, सभापती संतोष साटविलकर, प्रीतेश राऊळ, अनुराधा नारकर, रुहिता तांबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब आदी उपस्थित होते.










