ओवळीयेत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

५५ रक्तदात्यांचा सहभाग
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 21, 2026 12:54 PM
views 54  views

सिंधुदुर्गनगरी : श्री स्वयंभू रामेश्वर कलशारोहणाच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘श्री स्वयंभू रामेश्वर युवा प्रतिष्ठान ओवळीये’ व ‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल ५५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली. ओवळीये गावात प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहिलेच शिबिर असूनही त्यास मिळालेला भरघोस प्रतिसाद उल्लेखनीय ठरला. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य हर्षद आंगणे यांच्या विशेष प्रयत्नांतून या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान एसडीपी डोनर यशवंत गावडे (कुडाळ-विंगुर्ला विभाग संघटक), साईनाथ आंबेरकर (कुडाळ कार्यकारणी सदस्य) व गंधार भिसे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तदान, देहदान व अवयवदान या चळवळींचे महत्त्व विशद करत समाजात जनजागृतीची गरज अधोरेखित केली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला. ओवळीये आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक राजन गवस यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी डॉ. प्रशांत कोलते हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. त्यांनी देहदान व अवयवदान विषयावर प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्याची तयारी दर्शवली. कार्यक्रमाला गाव प्रमुख दादा परब, बाबा आंगणे, उद्योजिका सौ. पडवळ मॅडम, ओवळीयेच्या सरपंच सौ. कदम मॅडम, ओसरगावच्या सरपंच, हिवाळेचे सरपंच रघुनाथ धुरी, ग्रामपंचायत सदस्य अविनाश घाडीगावकर, बबन परब तसेच मंदिरातील मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वितेसाठी श्री स्वयंभू रामेश्वर युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते समीर सावंत, आशुतोष सावंत, नरेश घाडीगावकर, पप्पू निर्गुण, गणेश हिर्लेकर, संदीप सावंत, हर्षद आंगणे, सुशांत परब व भालचंद्र गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे प्रतिष्ठानतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.