वनविभागाने झाडे तोडल्याचा मुद्दा पं. स. सभागृहात गाजला

वन विभागालाच कामं, बाकीचे रिकामटेकडे ? : गौरव मुळीक
Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2026 14:23 PM
views 84  views

सावंतवाडी : वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाच काम आहेत का ? बाकीचे अधिकारी रिकामटेकडे आहेत का ? असा सवाल उपसभापती गौरव मुळीक यांनी उपस्थित करत पं.स. मासिक सभेला अधिकारी उपस्थित न राहिल्याने नाराजी व्यक्त केली. 


वनविभागाने झाडे तोडल्याचा मुद्दा यावेळी सभागृहात गाजला. माझ्या पत्राला वन विभागाने शहरातील मुद्दा असल्याने मुख्याधिकारी यांना कळवून झाडे तोडण्यात आल्याचे उत्तर दिले. ही बाब योग्य नसून उत्तर द्यावी लागतील म्हणून वन विभागाने बैठकीकडे पाठ फिरवल्याचा आरोप उपसभापती श्री. मुळीक यांनी केला. तर सदस्य जितेंद्र गांवकर यांनी सामान्य लोकांना वन विभाग त्रास देते. त्यामुळे या वृक्षतोडीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारावा. ते बैठकीला उपस्थित राहणार नसतील तर आपण त्यांच्या कार्यालयाला धडक देऊ असा इशारा श्री. गावकर यांनी दिला. यावेळी सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी उपस्थित होते. 


दरम्यान, जितेंद्र गांवकर यांनी सभापती सुस्मिता जाधव यांना वाहन उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी गटविकास अधिकारी यांनी वाहनाची नोंदणी झाली असून लवकरच ते आपल्या सेवेत येईल, त्याचा ताबा आपल्याला मिळेल. वाहन मिळाल्यानंतर चालकाचा विषय येत असून तो विषय देखील जिल्हा पातळीवर घेण्यात आला आहे. गाडी नसल्याने वेळप्रसंगी मी देखील स्वतःची खाजगी गाडी वापरून सभापती महोदयांना वाहन देतो अशी माहिती श्री. नाईक यांनी दिली. तर वाहन येईपर्यंत आपण समायोजन करू असे सभापती सुस्मिता जाधव यांनी सांगितले.