
सावंतवाडी : गेले अनेक वर्ष प्रलंबित असणार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडी, वेत्ये, आंबोलीत हव तिथे करा. पण ते एकदा पूर्ण करा. उपजिल्हा रुग्णालयात अपघाताचे रूग्ण मलमपट्टी करून गोव्याला पाठवले जातात. जागे अभावी हॉस्पिटल सावंतवाडीत होत नसेल तरी वेत्येत विनामोबदला जागा देतो. यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्या संमतीने यावर निर्णय घ्यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर यांनी केली.
पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांनी आयत्यावेळीच्या विषयावर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मुद्दा मांडला. श्री. गावकर म्हणाले, मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटलम जागे अभावी होत नसल्याने वेत्ये गावची ५ एकर जागा आम्ही विनामोबदला देण्यास तयार आहोत. सभापती, उपसभापतींसह आमदार दीपक केसरकर यांच्यासह बैठक करत हायवे टच असणाऱ्या या जागेवर हे हॉस्पिटल व्हावे. आमदार दीपक केसरकर यांनी यासाठी पाठपुरावा केला असून त्यांच्या संमतीने आपण निर्णय घ्यावा. हॉस्पिटल सावंतवाडीत करा, वेत्येला करा नाहीतर आंबोलीत करा. पण, ते एकदा पूर्ण करा अशी मागणी सदस्य श्री. गावकर यांनी केली. दरम्यान, ही सुचना घेऊन माहिती घेऊन पुढील बैठकीत त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेऊ अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी उपस्थित होते.










