
सिंधुदुर्गनगरी : तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा बुधवारी जोरदार गाजली . 'छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात' पार पडलेल्या या सभेत लोकप्रतिनिधींनी जनसामान्यांचे प्रश्न मांडताना प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. प्रशासकीय सुस्ती आता खपवून घेणार नाही,असा सज्जड दम देत लोकप्रतिनिधींनी पहिल्याच दिवशी चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीचे पोस्टमार्टम केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.यावूळी व्यासपिठावर जि. प.उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर,वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर,महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर,समाज कल्याण सभापती सहिता तांबे आदिसह सभागृहात गटनेते,जि. प. सदस्य, खातेप्रमुख उपस्थित होते.
अधिकारी 'निरुत्तर'; अध्यक्षांचा सक्त इशारा
सभेच्या सुरुवातीलाच विशेष सभेतील ठरावांवर चर्चा सुरू असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नव्हती. यावर जि.प. सदस्य संदेश सावंत यांनी तीव्र आक्षेप घेत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेत अध्यक्ष प्रमोद कामत यांनी, अशा प्रकारचा बेजबाबदारपणा पुन्हा चालणार नाही, कामात सुधारणा करा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना तडाखा दिला.
औरंगाबाद'च्या नावावरून गदारोळ.. अखेर माफी !
शालेय क्रीडा स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या थकीत शिष्यवृत्तीचा मुद्दा सुमेधा पाताडे यांनी लावून धरला. दोन वर्षे परीक्षा का झाल्या नाहीत? प्राविण्य मिळवलेल्या मुलांना शिष्यवृत्ती व प्रवास भत्ता का मिळाला नाही? असा जाब विचारला असता, संबंधित महिला अधिकाऱ्याने मी चार महिन्यांपूर्वीच औरंगाबादहून आले आहे, मला माहिती नाही,असे उत्तर दिले. या उत्तराने सदस्य अधिकच पेटले. सिंधुदुर्गात काम करताना येथील माहिती असणे आवश्यक आहे, औरंगाबादचे कारण सांगू नका, असे म्हणत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेर त्या महिला अधिकाऱ्याने सभागृहात 'सॉरी' म्हणत माफी मागितली.
औषधे 'जिरतात' कुठे? - भ्रष्टाचाराचा संशय
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांत औषधांचा पुरवठा होत नसल्याचा मुद्दा रुपेश कानडे यांनी मांडला. त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी ३० लाखांची औषधे शिल्लक असल्याचे सांगितले. या उत्तराने सदस्य संदीप गावडे संतापले. जर साठा शिल्लक आहे, तर तो पोहोचत का नाही? ही औषधे नेमकी जिरतात कुठे? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणामागे मोठा भ्रष्टाचार असल्याचे सूचित केले. आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
पाणी योजनेचे वाभाडे अन् शेतीचे नुकसान
कुडाळ तालुक्यातील तेरसे बांबर्डे येथे १.७५ कोटी खर्चून विहीर बांधली, पण पाणी नाही असे सांगत रुपेश कानडे यांनी हा 'पांढरा हत्ती' सभागृहासमोर आणला.
गळक्या शाळा प्रश्नी बोलताना शाळा पडल्यानंतर चर्चा करण्यापेक्षा आधी दुरुस्ती करा,"अशा शब्दांत सदस्यांनी शिक्षण विभागाचे कान टोचले. आंबा-काजू पिकाच्या नुकसानीबद्दल आंब्याला ५ लाख व काजूला ३ लाख रुपये हेक्टरी मदत देण्याचा ठराव संजय गावडे यांनी मांडला.वाहनचालक भरतीसाठी एजन्सी नेमण्यास मायकल डिसोजा यांनी कडाडून विरोध दर्शवला. या सभेत संदेश सावंत, संदीप गावडे, सुमेधा पाताडे, रुपेश कानडे, गंगाराम सडवेलकर, मनोज रावरणे, सावी लोके या सदस्यांनी विविध प्रश्नांवर प्रशासनाची नाकेबंदी केली.










