
सिंधुदुर्गनगरी : शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक पर्वणी ठरणारा ‘इतिहास कट्टा’चा पहिला भव्य कार्यक्रम येत्या शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय इतिहास संकलन समिती (सिंधुदुर्ग जिल्हा) यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व वक्ते रविराज पराडकर यांचे व्याख्यान. शिवकालीन किल्ले, मराठा आरमार तसेच छत्रपतींच्या प्रशासन आणि अर्थनीतीवर त्यांचा सखोल अभ्यास असून, त्यांनी ‘शिव छत्रपतींची अर्थनीती’ आणि ‘स्वराज्याचे तटरक्षक’ यांसारख्या विषयांवर लेखन केले आहे. रायगडावरील ‘शिवराजाभिषेक’ सोहळ्याचे महत्त्व जनमानसात पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
कार्यक्रमात ‘श्री शिवरायांची राजनीती’ या मुख्य विषयावर तांत्रिक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण सादर केले जाणार आहे. तसेच व्याख्यानानंतर विशेष प्रश्नोत्तर व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, उपस्थितांना थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
हा कार्यक्रम शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी (कुडाळ) येथे सायंकाळी ४ वाजता होणार असून, नोंदणी व चहापान दुपारी ३.३० वाजल्यापासून सुरू होईल. श्री शिव पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य व खुला आहे. इतिहासाच्या अभ्यासाला चालना देणाऱ्या या उपक्रमास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










