जिल्हा व्यापारी महासंघाच्या नवनियुक्त कार्यकारिणीची 'दशसूत्री' जाहीर

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 31, 2026 20:12 PM
views 201  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची नवनियुक्त कार्यकारिणी बिनविरोध निवडून आल्यानंतर, कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत नूतन अध्यक्ष संजय सावंत यांनी महासंघाच्या आगामी तीन वर्षांच्या कार्याची दिशा स्पष्ट केली. स्थानिक व्यापाऱ्यांचे संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देणारी 'दशसूत्री' यावेळी मांडण्यात आली. पत्रकार परिषदेच्या प्रारंभी, महासंघाचे निर्माते भाऊसाहेब धडाम, अनंतराव पोकळे, प्रताप केनवडेकर व अन्य ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी ४० वर्षांपूर्वी या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली, त्याबद्दल अध्यक्षांनी कृतज्ञता व्यक्त केली. या वारशाला साजेसे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

आगामी काळातील प्रमुख नियोजित कामे

१. गॅस टंचाईवर तोडगा: जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली पेट्रोलियम व गॅस टंचाई दूर करण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू असून, लवकरच ठोस तोडगा काढला जाईल.

२. स्थानिक व्यापाऱ्यांचे संरक्षण: आठवडा बाजारात परराज्यातील फिरते व्यापारी विनाकर व्यापार करतात, ज्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आठवडा बाजार एकाच दिवशी असावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल.

३. अन्न सुरक्षा मार्गदर्शन: व्यापारी बांधवांवर प्रशासकीय कारवाई होऊ नये, यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जात आहेत. ९ तारखेला तरळे येथे अशाच एका कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

४. महिला सक्षमीकरण: शहर आणि ग्राम स्तरावर महिला समित्या स्थापन करून महिला व्यापाऱ्यांना सक्षम केले जाईल. यासाठी 'पारकर' यांची स्वीकृत महिला सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. युवा उद्योजकांना प्रोत्साहन: नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण, शासकीय धोरणांची माहिती आणि मार्गदर्शन मेळावे आयोजित केले जातील.

६. बाजारपेठ सुरक्षा: जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.

७. घटनादुरुस्ती: धर्मादाय आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक बदल करून महासंघाची घटना अधिक सक्षम केली जाईल.

८. सदस्य नोंदणी: आगामी तीन वर्षात सभासद संख्या वाढवण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

९. उपसमित्यांचे सक्षमीकरण: मागील अध्यक्षांनी नेमलेल्या उपसमित्यांना अधिक सक्रिय आणि अधिकारसंपन्न केले जाईल.

१०. पारदर्शक प्रशासन: निवडणूक बिनविरोध आणि शांततेत पार पडली असून, सर्वांच्या सहमतीने काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष संजय सावंत, उपाध्यक्ष पुंडलिक दळवी, अवधूत शिरसाठ, कार्यवाह राजू जठार, सहकार्यवाह राजन नाईक, कोषाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर आणि कार्यकारिणी सदस्य श्रीपाद चोडणकर, गणेश (बाळासाहेब) बोर्डेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, नंदकिशोर टोपले, श्रीराम शिरसाट, सागर शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.