केसरकरांविरोधातल्या मोर्चात पैसे देऊन भाडोत्री माणसे | गोपाळ गवस यांचा टोला

विरोधकांनी आधी स्वतःकडे पाहण्याचा सल्ला
Edited by: संदीप देसाई
Published on: March 31, 2026 20:28 PM
views 60  views

दोडामार्ग : ज्यांनी स्वतःचा पक्ष दावणीला लावला, पक्ष विकला, त्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची भाषा करू नये, असा स्पष्ट इशारा शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुका संघटक गोपाळ गवस यांनी विरोधकांना दिला आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे की, आज विरोधी पक्षातील कार्यकर्तेच आपल्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत आहेत आणि पक्ष रसातळाला गेल्याची कबुली देत आहेत. अशा परिस्थितीत दुसऱ्यांवर बोट दाखवण्यापेक्षा आधी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

गवस यांनी आमदार दीपक केसरकर यांना स्पष्टवक्ते, सौजन्यशील आणि साईभक्त नेते म्हणून संबोधत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे समर्थन केले. ते नियमितपणे शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतात आणि देवभक्ती त्यांच्या स्वभावात आहे, असे त्यांनी नमूद केले. आ. केसरकर यांच्या विरोधी काढण्यात आलेल्या मोर्चावर टीका करत गवस म्हणाले की, हा मोर्चा पूर्णपणे बनावट होता आणि त्यासाठी भाडोत्री लोकांना पैसे देऊन आणण्यात आले. त्यामुळे विरोधकांची मतदारसंघातील खरी ताकद उघड झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. तर काही नेत्यांवर टीका करत त्यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांच्या कार्यालयातून आर्थिक मदत घेऊन मोठे झालेलेच लोक आज त्यांच्याविरोधात बोलत आहेत.

आमदार केसरकर यांच्या साईभक्तीचा दाखला देताना त्यांनी एक प्रसंग सांगितला. गुवाहाटी ते मुंबई प्रवासानंतर शिर्डीकडे जाताना ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते. त्यांना त्यावेळी एक कॉल आला. पलीकडून मोबाईलवर साईबाबांची आरती सुरू असल्याचा आला. यावेळी केसरकर साहेब मोबाईलवर ती आरती ऐकत भक्तीत तल्लीन झाल्याचे आम्ही पहिल्याचे आवर्जून  सांगितले.

‘भोंदू बाबा’ प्रकरणावर पलटवार करत गवस यांनी प्रश्न उपस्थित केला की, तुमचे मुख्यमंत्री असताना सिन्नर तालुक्यातील एका संस्थेला ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्या निर्णयाला कॅबिनेटची व मुख्यमंत्र्यांची मंजुरी होती. मग त्याची जबाबदारी कोणाची?

ज्या भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे अशा प्रकारे पाणी देणे योग्य होते का, असा सवालही त्यांनी केला. शेवटी इशारा देत गवस म्हणाले, दीपक केसरकर यांच्यावर खोटे आरोप करू नका. आमच्याकडेही अनेक गोष्टी उघड करण्यासाठी वेळ लागणार नाही. दुसऱ्यांच्या सांगण्यावर बोलू नका, अन्यथा कठोर शिवसैनिकांना सामोरे जावे लागेल.