भरधाव बोलेरो जीप दुभाजकावर चढली

दोन लहान मुलांसह चौघे बालंबाल बचावले
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 31, 2026 20:15 PM
views 95  views

कुडाळ: कुडाळ येथील तहसील कार्यालयाजवळील मुख्य रस्त्यावर आज सायंकाळी भीषण अपघात घडला. पिंगुळीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही जीप थेट दुभाजकावर (डिव्हायडर) चढली. सुदैवाने, या अपघातात दोन लहान मुलांसह चार प्रवासी सुखरूप बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कुडाळ कॉलेज चौक ते अभिमन्यू हॉटेल दरम्यान घडली. बोलेरो जीप पिंगुळीकडून सावंतवाडीकडे जात असताना तहसील कार्यालयाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. वेगात असलेली जीप रस्ता दुभाजकावर चढली आणि तिची पुढची चाके दुसऱ्या लेनवर जाऊन थांबली.

अपघात इतका विचित्र होता की यात दुभाजकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. जीपमधील प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.