कसालला उद्या 'महाराजस्व समाधान शिबिर'

१५ महत्त्वाच्या सेवांचा एकाच छताखाली मिळणार लाभ
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 13, 2026 16:33 PM
views 18  views

कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)' अंतर्गत, उद्या शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी कसाल मंडळ स्तरावर विशेष महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कसाल ग्रामपंचायत हॉल येथे सकाळी १०:०० वाजता हे शिबिर सुरू होणार असल्याची माहिती कुडाळचे प्रभारी तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी दिली आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांच्या सोयीसाठी हे अभियान राबवण्यात येत असून, यामध्ये महसूल विभागाशी संबंधित १५ प्रमुख सेवांचा लाभ एकाच दिवशी दिला जाणार आहे.

या सेवांचा घेता येणार लाभ :

शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्र, तसेच नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वाटप केले जाईल. याव्यतिरिक्त खालील महत्त्वाच्या कामांसाठी मार्गदर्शन व कार्यवाही केली जाणार आहे. जमीन संबंधित: अकृषिक (NA) परवानगी, 'सनद' प्रक्रिया माहिती, तुकडेबंदी कायदा उल्लंघन प्रकरणांचा निपटारा आणि 'कमी-जास्त पत्रके' तयार करून गाव दफ्तर अद्ययावत करणे.

योजना व नोंदणी: संजय गांधी निराधार योजनेचे लाभ मंजूर करणे, Agristack शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी आणि आयुष्मान भारत कार्डाचे वाटप.

इतर: शिधापत्रिकेतील (Ration Card) नावे कमी किंवा जास्त करणे, घरांसाठी पट्टे वाटप आणि ई-मोजणी अर्ज स्वीकारणे.

कसाल मंडळांतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपल्या अर्जासोबत आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात, जेणेकरून कामाचा निपटारा जलद गतीने होईल, असे आवाहन तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी केले आहे.