
सावंतवाडी : महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःसाठी वेळ काढणे ही काळाची गरज आहे. समाजात वावरताना स्वतःची सुरक्षितता आणि एकटेपणाचा सकारात्मक वापर कसा करावा, याचे भान वाचनातून येते. वाचनामुळेच अन्यायाविरुद्ध लढण्याची वैचारिक शक्ती प्राप्त होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका व मानसशास्त्रीय समुपदेशक कावेरी कासरलकर-मयेकर यांनी केले. मळगाव येथील वाचनालयात आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरातर्फे ‘कै. यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाचा हा मानाचा पुरस्कार प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी मिलिंद खानोलकर यांना प्रदान करण्यात आला. उज्ज्वला खानविलकर-पटेकर पुरस्कृत हा सोहळा नारीशक्तीचा गौरव करणारा ठरला. आपल्या 'कात्यायनी' या पुस्तकाचा संदर्भ देत कासरलकर म्हणाल्या की, स्त्रियांनी कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात मोबाईलचा वापर टाळण्यापेक्षा त्याचा विधायक कामांसाठी वापर करून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. अश्विनी खानोलकर भावूक झाल्या. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय सासरच्या मंडळींना व पतीला दिले. "वैद्यकीय सेवेतील माझी लहान रुग्ण मुले हाच या पुरस्काराचा खरा भाग आहेत," असे त्यांनी नमूद केले. वाढत्या जंक फूडच्या धोक्याबाबत पालकांना सतर्क करताना त्यांनी मुलांना मोड आलेली कडधान्ये, फळे आणि पालेभाज्या देण्याचा सल्ला दिला. मुलांच्या हातात मोबाईल देण्याऐवजी त्यांना मैदानी खेळ खेळू द्यावे आणि पालकांनी त्यांचे मित्र बनावे, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
नारीशक्ती प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर
वाचनालयाच्या पहिल्या सन्मानित महिला ललिन तेली यांनीही यावेळी आपले विचार मांडले. "मुलगा कुलदीपक असेल तर मुलगी ही 'दीपिका' आहे. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध करत आहे, तिला फक्त संधी आणि पाठबळाची गरज आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले. या सोहळ्यात डॉ. अश्विनी खानोलकर यांचा सन्मान शाल, श्रीफळ, रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन लेखिका स्मिता नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर होते. यावेळी उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, संचालक हेमंत खानोलकर, शांताराम गवंडे, चंद्रकांत जाधव, डॉ. मिलिंद खानोलकर, निखिल कासरलकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कार्यवाह स्नेहा खानोलकर यांनी केले.










