
सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच पाणी संवर्धनाबाबत सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात ८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत ‘जलमहोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ ८ मार्च रोजी वेंगुर्ला तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायत, महसुल गाव कर्ली येथे होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली.
या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातील पेयजल व स्वच्छता विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री व्ही. सोमनन्ना, विभागाचे सचिव अशोककुमार मीना तसेच संचालक प्रदीप सिंग उपस्थित राहणार आहेत. जलमहोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विविध जनजागृती व प्रत्यक्ष कृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पाणी ही केवळ पायाभूत सुविधा नसून ती सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांशी जोडलेली बाब असल्याने पाण्याची जपणूक आणि संवर्धनासाठी स्थानिक परंपरांचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत गावागावात महिलांना पाणी तपासणीसाठी प्रोत्साहन, फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी ‘यंग ब्रिगेड’ची स्थापना, तसेच शाळांमध्ये जलसंवर्धनाविषयी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायत विकास आराखड्यात जलसंवर्धनाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यावरही भर दिला जाणार आहे.
गाव आणि पंचायत समिती स्तरावर लोकजल उत्सव साजरा करण्यात येणार असून तो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल. पिण्याच्या पाण्याला सामाजिक व सांस्कृतिक प्राधान्य देणे, विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौरऊर्जा आणि देखभाल-दुरुस्ती यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करणे तसेच आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा या जलमहोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या कालावधीत ग्रामसभा आणि पाणी समित्यांच्या माध्यमातून गावस्तरावर प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात येणार आहे. जलस्त्रोतांचे संरक्षण, पुनरुज्जीवन आणि स्वच्छता, पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण तसेच सामुदायिक शपथ घेण्यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.










