प्रलंबित प्रस्तावांवर निर्णयासाठी शिक्षक भारतीचे साखळी धरणे आंदोलन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 05, 2026 20:23 PM
views 24  views

सिंधुदुर्गनगरी :  अनुकंपा नियुक्ती, वरिष्ठ वेतनश्रेणी, सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या शिक्षणसेवकांना कायम मान्यता तसेच वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, या मागण्यांसाठी शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने आजपासून जिल्हा परिषद भवनासमोर बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेने यापूर्वी शिक्षण विभागाकडे निवेदन सादर केले होते. त्यावेळी संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनुकंपा नियुक्तीअंतर्गत भुईबावडा येथील आदर्श विद्यामंदिरचे अक्षय विलास मोरे तसेच तेंडोली येथील परशुराम नाईक हायस्कूलचे शांताराम उमेश चिंदरकर यांचे शिपाई पदाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी संदर्भात सरंबळ हायस्कूलचे किशोर गोविंद चव्हाण, आडवली (मालवण) येथील आर. ए. यादव हायस्कूलचे साईनाथ गोविंदराव झाडे आणि कुडाळ हायस्कूलच्या स्नेहल आंबेकर यांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय संडावे हायस्कूलचे महेश जाधव, विलावडे हायस्कूलचे वनसिंग पाडवी आणि नरडवे हायस्कूलच्या राजश्री अडुळकर यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा मान्यता प्रस्तावही प्रलंबित आहेत. सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलमधील जयवंत कृष्णा तायशेटे, श्रीदत्त नारायण प्रभूखानोलकर, हितेश दिलीप मालंडकर आणि जॉर्ज अंतोन डिमेलो या शिक्षणसेवकांना कायम मान्यता देण्याचा प्रस्तावही अद्याप निकाली लागलेला नाही.

दरम्यान, या सर्व प्रस्तावांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिक्षक भारतीच्या वतीने दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी साखळी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेत आजपासून जिल्हा परिषद समोर बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी संघटनेचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेकर, सुनील जाधव, विठोबा कुडव, समीर परब, आकाश पारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.