
सिंधुदुर्गनगरी : उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न १०८ रुग्णवाहिकेला प्रवासादरम्यान अचानक गंभीर बिघाड झाल्याची घटना समोर आली असून या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या बाबतची बातमी कोकणसाद लाईव्ह च्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या बाबत चौकशी करून दोशिंवर कडक कारवाई करावी असे आदेश आरोग्य प्रशासनाला दिले आहेत.
२५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला येथून ओरोसकडे रुग्ण घेऊन हा रुग्ण सोडून पुन्हा ही रुग्ण वहीका वेंगुर्ल्याला जात असताना संबंधित १०८ रुग्णवाहिकेच्या मागील दोन्ही चाके गाडीपासून सुटल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ही घटना अत्यंत गंभीर आणि निष्काळजीपणाचे द्योतक मानली जात आहे.
१०८ रुग्णवाहिका सेवा ही आपत्कालीन आणि अत्यावश्यक स्वरूपाची सेवा असल्याने वाहनांची नियमित तपासणी, देखभाल व दुरुस्ती करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा व्यवस्थापकांना पत्राद्वारे खालील बाबींवर तात्काळ खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
संबंधित रुग्णवाहिकेची शेवटची तांत्रिक तपासणी कधी करण्यात आली?
देखभाल नोंदवही (Maintenance Log Book) उपलब्ध आहे का? असल्यास त्याची प्रत सादर करावी.
नियमित पाहणी व तपासणीबाबत अधिकाऱ्यांनी कोणती कार्यवाही केली?
घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कोणती शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे?
या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक दालनात बैठक बोलावण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना अनिवार्य उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन सेवेतील अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










