ओळख दाखवाल तर शिक्षा अटळ..!

उत्तरपत्रिकेत ओळख दर्शवल्यास विषय रद्द ; मंडळाचा कडक इशारा
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 26, 2026 14:08 PM
views 139  views

सिंधुदुर्गनगरी : दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ने विद्यार्थ्यांना कडक इशारा दिला आहे. उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारे स्वतःची ओळख दर्शविल्यास संबंधित विषयाची संपादनूक रद्द होऊन परीक्षार्थी अनुत्तीर्ण ठरविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती केली आहे. परीक्षा पूर्व, परीक्षा कालावधी आणि परीक्षोत्तर गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तरपत्रिकेत ओळख म्हणजे थेट गैरमार्ग

शिक्षासूचीत नमूद केल्याप्रमाणे उत्तरपत्रिकेत नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, शाळा/केंद्राचे नाव लिहिणे, ठरलेल्या जागेशिवाय बैठक क्रमांक नमूद करणे, विशिष्ट चिन्हे, संदेश, विनंती, चित्र किंवा ओळख पटेल अशी कोणतीही खूण करणे हा गंभीर गैरमार्ग समजला जाणार आहे. अशा प्रकरणात संबंधित विषयाची संपादनूक रद्द करण्यात येईल.

३२ प्रकारचे गैरमार्ग ; कठोर शिक्षांची तरतूद

मंडळाने जानेवारी २०२० पासून सुधारित “परीक्षार्थी गैरमार्ग – शिक्षासूची” लागू केली असून त्यात एकूण ३२ प्रकारच्या गैरप्रकारांचा समावेश आहे. परीक्षा पूर्व, परीक्षा कालावधी आणि परीक्षोत्तर काळातील सर्व गैरमार्ग स्वतंत्रपणे वर्गीकृत करण्यात आले आहेत.

परीक्षा पूर्व गैरप्रकार :

बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती, दुसऱ्याच्या वतीने परीक्षा देण्याचा प्रयत्न, प्रश्नपत्रिका मिळविण्याचा प्रयत्न इत्यादी प्रकारांवर परीक्षा रद्द किंवा दीर्घकालीन बंदीची तरतूद आहे.

परीक्षा कालावधीतील गैरप्रकार:

कॉपी करणे/करवणे, चिट-नोट्स वा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर, प्रश्नपत्रिकेची देवाणघेवाण, गोंधळ घालणे, उत्तरपत्रिका फाडणे आदी प्रकारांमध्ये विषय किंवा संपूर्ण परीक्षा रद्द करण्यासोबतच पोलिसांत गुन्हा दाखल होऊ शकतो.

परीक्षोत्तर गैरप्रकार :

उत्तरपत्रिका अनधिकृतरीत्या नेणे, फेरफार करणे, परीक्षकांशी संपर्क साधणे, गुणपत्रिकेत बदल करणे इत्यादी कृत्ये गंभीर गुन्हा मानली जातील.

पोलिस व सायबर कारवाईचीही तरतूद

प्रश्नपत्रिका लीक करणे, डिजिटल माध्यमातून गैरमार्ग करणे, लाच देणे किंवा दडपण आणणे यांसारख्या प्रकारांमध्ये पोलिसांत गुन्हा दाखल करून सायबर कायद्यान्वये कारवाई केली जाईल.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी व्यापक मोहीम

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाने मागील दोन वर्षांत कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. सीसीटीव्ही निगराणी, संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे पाहणी, भरारी पथके, शिक्षासूचीचे प्रकट वाचन, जागृती सप्ताह, माहितीपर व्हिडिओ आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

“नकळत चूकही महागात पडू शकते”

विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत विनंती, शुभेच्छा किंवा अतिरिक्त माहिती लिहिणे टाळावे. नियमांचे काटेकोर पालन करणे हाच सुरक्षित मार्ग असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. “जागरूकतेमुळे गैरप्रकारांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आता परीक्षोत्तर गैरप्रकारही कमी व्हावेत यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे,” असे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा देत कोणत्याही गैरप्रकारांपासून दूर राहावे, अन्यथा शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ शकते, असा पुनरुच्चार मंडळाने केला आहे.