
कुडाळ : कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे आज जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. मात्र, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रणजीत देसाई यांच्या एका विधानाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. "सध्या मी सायलेंट मोडवर असून, जे काही बोलायचे आहे ते गुढीपाडव्यानंतरच बोलेन," असे सूचक वक्तव्य देसाई यांनी यावेळी केले.
गेल्या अनेक दिवसांपासून रणजीत देसाई हे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. पत्रकार संघाच्या व्यासपीठावर बोलताना त्यांनी स्वतःच यावर शिक्कामोर्तब केले. मागील दोन-तीन महिन्यांत आपण कोणतीही राजकीय भूमिका मांडलेली नाही किंवा जाहीर भाष्य केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच गुढीपाडव्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगत त्यांनी सर्वांची उत्सुकता ताणली आहे.
पत्रकार पुरस्कार सोहळा असल्याने त्यांनी पत्रकारांचे कौतुक केले, मात्र राजकीय वक्तव्य करतेवेळी "आज मी काहीही बोलणार नाही, सध्या शांत राहणे पसंत केले आहे," असे म्हणत त्यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले. त्यांच्या या भूमिकेमुळे ते नेमकी कोणती 'राजकीय गुढी' उभारणार, याबाबत आता सिंधुदुर्गात तर्कवितर्क लढवले जात आहेत. "मागील काही महिन्यांपासून मी शांत आहे, कोणतीही भूमिका घेतलेली नाही. सध्या मी सायलेंट मोडवर असून नवीन वर्षात, म्हणजेच गुढीपाडव्यानंतरच सविस्तर बोलेन. असं रणजीत देसाई यांनी सांगितलं.
रणजीत देसाई यांनी जरी स्पष्टीकरण दिले नसले, तरी त्यांच्या शब्दांमागे मोठी राजकीय रणनीती दडलेली असल्याचे बोलले जात आहे. गुढीपाडव्याला ते नेमकी काय भूमिका मांडणार की पक्षात सक्रिय होऊन मोठी जबाबदारी स्वीकारणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










