
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ओरोस बुद्रुक गावात हत्तीरोग सदृश्य लक्षणे असलेले तीन रुग्ण आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हे रुग्ण परराज्यातून कामानिमित्त आलेले भाडेकरू असून, आरोग्य विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णांवर त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू केले आहेत.
एकाच परिसरातील भाडेकरूंना लागण
ओरोस बुद्रुक येथे वास्तव्यास असलेल्या तीन परप्रांतीय कामगारांना हत्तीरोगाची प्राथमिक लक्षणे दिसून आली. हे तिन्ही रुग्ण एकाच परिसरात भाड्याने राहत असल्याचे समोर आले आहे. ही माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने संबंधित परिसरात डास निर्मूलन फवारणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तातडीने या रुग्णांची तपासणी केली. या रुग्णांना बाहेर न हलवता, त्यांच्या राहत्या घरीच औषधोपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१२ दिवसांचा उपचार:
पुढील १२ दिवस या रुग्णांना घराकडेच संपूर्ण औषधोपचार दिला जाणार आहे.
सर्व सोयी उपलब्ध:
आरोग्य विभागाच्या वतीने सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि देखरेख रुग्णांच्या निवासस्थानीच पुरवली जात आहे.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
एकाच वेळी तीन रुग्ण आढळल्याने ओरोस परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हत्तीरोग हा प्रामुख्याने डासांमुळे पसरत असल्याने परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.










