
मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात शिंदे शिवसेनेने एबी फॉर्म दिल्यावरून भाजप तालुकाध्यक्ष यांनी काल आक्रमक भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर आज कणकवली येथे नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार निलेश राणे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांविरोधात अर्ज भरलेल्या शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद शमला आहे अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली.
तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात शिंदे शिवसेनेने एबी फॉर्म दिल्याचे दिसून आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यात तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून आम्ही तो सहन करणार नाही अशी भूमिका घेतली.
या वादाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी कणकवली येथे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, संतोष गावकर, दाजी सावजी यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते. यावेळी भाजप उमेदवारांच्या विरोधात ज्या ठिकाणी शिंदे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत, त्यांना आपले अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन नारायण राणे यांनी दिले. त्याचबरोबर ज्यांनी एबी फॉर्म दिले त्यांना समज दिली जाईल असे स्पष्ट केले. यासंदर्भात आमदार निलेश राणे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून महायुतीचा धर्म पाळला जाईल. महायुती संदर्भातील सर्व विषयांची चर्चा आमदार निलेश राणे, भाजप तालुकाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि आपल्यात होईल असेही श्री. चिंदरकर यांनी सांगितले. एबी फॉर्म वरून जो वाद निर्माण झाला होता तो राणेंच्या मध्यस्थीने अखेर शमला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.










